दास नवमीच्या मुहूर्तावर 'रघुवीर'चे मोशन पोस्टर प्रदर्शित...

दास नवमीच्या मुहूर्तावर 'रघुवीर'चे मोशन पोस्टर प्रदर्शित...

दास नवमीच्या मुहूर्तावर 'रघुवीर'चे मोशन पोस्टर प्रदर्शित...
_६ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित...

* सिने प्रतिनिधि

           महाराष्ट्रातील थोर संत समर्थ रामदास स्वामी यांनी ज्ञान आणि भक्तीचा संगम घडवत जनमानसाला सोप्या शब्दांत आध्यात्माचे ज्ञानामृत पाजले. अवखळ मनाला सज्जनाची उपमा देत भक्तीपंथावर आणले अशा समर्थ रामदास स्वामींचं चरित्र आता रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. 'रघुवीर' हा आगामी मराठी चित्रपट समर्थ रामदास स्वामींच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणार आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

     दास नवमीच्या मुहूर्तावर सज्जनगडावर 'रघुवीर' चित्रपटाच्या मोशन पोस्टर प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला दुर्गा प्रसाद स्वामी, बाळासाहेब स्वामी, भूषण स्वामी, समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, मार्कंडबुवा रामदासी, समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेशबुवा रामदासी, बोबडेसाहेब, शुभचिंतक जयेश हरेश्वर जोशी यांच्या उपस्थितीत 'रघुवीर'चं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. या सोहळ्याला निर्माते अभिनव विकास पाठक, सहनिर्माते छगन बडगुजर, वैभव मानकर, दिग्दर्शक निलेश कुंजीर, कार्यकारी निर्माते सचिन सुहास भावे, सिनेमॅटोग्राफर प्रथमेश रांगोळे, 'रघुवीर'मध्ये टायटल रोलमधील विक्रम गायकवाड, इतर कलाकार, निर्माते, दिग्दर्शक व तंत्रज्ञ उपस्थित होते. 

    सिनेमास्टर्स एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या 'रघुवीर'ची निर्मिती डायनॅमिक प्रोडक्शन्स आणि आदित्यम क्रिएशन्सच्या सहयोगानं समर्थ क्रिएशन्सनं यांनी केली आहे. अभिनव विकास पाठक आणि अरविंद सिंह राजपूत या चित्रपटाचे निर्माते असून, वैभव किशोर मानकर, सपना किरण बडगुजर आणि डॅा. किरण छगन बडगुजर सहनिर्माते आहेत. समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल एन्टरटेन्मेंट अँड मीडिया प्रा. लि. या चित्रपटाचे वितरक आहेत. निलेश कुंजीर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शत केलं आहे. 'श्रीराम जयराम जय जय राम...' असा घोष करत सादर करण्यात आलेल्या मोशन पोस्टरमध्ये ऋतुजा देशमुख, नवीन प्रभाकर, शैलेश दातार, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी या कलाकारांचे लुक रिव्हील करण्यात आले आहेत. मोशन पोस्टरच्या अखेरीस समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेत विक्रम गायकवाड दिसतात. ६ एप्रिल रोजी 'रघुवीर' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचंही मोशन पोस्टरमध्ये पहायला मिळतं. 

   या चित्रपटात भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, देव निखार्गे, गणेश माने यांच्याही भूमिका आहेत. 'रघुवीर'चे दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनीच संगीत नाटक अकादमी पारितोषिक विजेते अभिराम भडकमकर यांच्या साथीने पटकथा लिहिली आहे. संवादलेखनाची बाजू अभिराम भडकमकर यांनीच केलं आहे. या चित्रपटाती गीतं मंदार चोळकरनं लिहिली असून, संगीतकार अजित परबने संगीत दिग्दर्शन केलं आहे. डिओपी धनराज सुखदेव वाघ आणि प्रथमेश नितीन रांगोळे यांनी छायालेखन केलं असून, संकलन जागेश्वर ढोबळे आणि प्रशांत चंद्रकांत कांबळे यांनी केलं आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन सुहास भावे आहेत.