२४ फेब्रुवारीला रिलीज होणार सामाजिक चित्रपट 'मसुटा'

२४ फेब्रुवारीला रिलीज होणार सामाजिक चित्रपट 'मसुटा'

२४ फेब्रुवारीला रिलीज होणार सामाजिक चित्रपट 'मसुटा'

* सिने प्रतिनिधि    
                        आज मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवरील निरनिराळ्या धाटणीचे चित्रपट बनत आहेत. असाच एक वेगळ्या वाटेनं जाणारा 'मसुटा' असं शीर्षक असलेला मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सामाजिक मनोरंजक सिनेमाच्या व्याख्येत अचूक बसणारा 'मसुटा' हा चित्रपट २४ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे मराठी रसिकांसमोर एक आगळी वेगळी कथा येणार आहे. 

काशिबाई फिल्म्स प्रोडक्शन आणि साईसागर प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या 'मसुटा' या चित्रपटाची निर्मिती भरत मोरे आणि मनेश लोढा यांनी केली आहे. अजित देवळे आणि सुनील शिंदे या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर्स आहेत. अजित देवळे यांनीच 'मसुटा'चं दिग्दर्शन आणि संकलनही केलं आहे. 'मसुटा' हा चित्रपट म्हणजे जगण्यासाठी धडपड करणारी जगावेगळी कर्मकहाणी आहे. यात समाजातील एका विशिष्ट वर्गातील मनाला भिडणारी कथा पहायला मिळेल. या चित्रपटाच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेशही देण्यात आले आहेत. दिग्दर्शक अजित देवळे यांनी हे सर्व आपल्या अनोख्या दिग्दर्शनशैलीद्वारे मनोरंजक करण्याचं काम केलं आहे. या चित्रपटानं आजवर देश-विदेशांतील बऱ्याच सिने महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. 

याबाबत दिग्दर्शक देवळे म्हणाले की, 'मसुटा' हा जरी एका विशिष्ट वर्गातील कुटुंबाची कथा सांगणारा असला तरी परिपूर्ण मनोरंजक चित्रपट आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये, प्रासंगिक गीतरचना आणि सुमधूर संगीताची किनार याला जोडण्यात आली आहे. मराठीसह हिंदीतही वावरणाऱ्या आघाडीच्या कलाकारांसह इतर कलावंतांनी हृदयस्पर्शी अभिनय केला आहे. अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी पटकथा हे या चित्रपटाचं सर्वात मोठं बलस्थान आहे. वास्तववादी लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेला हा चित्रपट प्रेक्षकांना वास्तवदर्शी अनुभव देईल याची निश्चितच खात्री असल्याचे दिग्दर्शक देवळे यांनी सांगितले. पटकथा लेखन करणार्‍या भरत मोरे यांनी माहिती देताना सांगितले, मी वास्तविक लेखन करत असताना अनेक स्मशानात गेलो, म्हसणजोगी कुटूंबाची कर्मकहानी त्यांच्याच मुखातून समजावून घेतली. या आधुनिक जगापुढे आपल्या पारंपरिक व्यवसायामुळे आजही या म्हसणजोगी समाजाला किती यातना सहन कराव्या लागतात या इतर शिक्षीत समाजाला सांगण्याचा काहीसा धाडसी प्रयत्न लिखाणातून केला आहे. समस्त जगभरातील मानवजातीला देहदानाचा संदेश या चित्रपटाच्या अति मनोरंजक कथानकातून करून देणार असल्याने मायबाप रसिक प्रेक्षकांना मनोरंजनाची अनोखी मेजवानी नक्कीच मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

'मसुटा'चं पटकथा लेखन भरत मोरे यांनी केलं असून, अनिल राऊत यांनी संवाद लिहिले आहेत. अनंत जोग, नागेश भोसले, हृदयनाथ राणे, रियाझ मुलाणी, अर्चना महादेव, वैशाली केंडाळे, कांचन पगारे, यश मोरे आदी कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. गीतरचना आणि संगीत अविनाश पाटील व सुनील म्हात्रे यांचं आहे. आदर्श शिंदे, अबोली गिऱ्हे, अविनाश पाटील यांनी या चित्रपटासाठी गायन केलं असून कॅास्च्युम डिझाईन चैत्राली डोंगरे यांनी केलं आहे. डिओपी दिलशाद व्ही. ए. यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, पार्श्वसंगीत पिनाकी रॅाय यांनी केलं आहे. बॉक्स हिट मूव्हीज या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळणार आहे.