डिस्ने स्टारची नवी मराठी चित्रपट वाहिनी ‘प्रवाह पिक्चर’ प्रेक्षकांच्या भेटीला

डिस्ने स्टारची नवी मराठी चित्रपट वाहिनी ‘प्रवाह पिक्चर’ प्रेक्षकांच्या भेटीला

डिस्ने स्टारची नवी मराठी चित्रपट वाहिनी ‘प्रवाह पिक्चर’ प्रेक्षकांच्या भेटीला

 - मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार आणि मान्यवरांची खास हजेरी

 - दर रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार नव्या सिनेमांचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

* प्रतिनिधि

 

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुटुंबाने एकत्र येण्याचे प्रसंग फार कमी वेळा जुळून येतात. सिनेमा हे एक असं जादुई माध्यम आहे जे संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतं. यानिमित्ताने आठवणींना उजळा मिळतो आणि नकळत चेहऱ्यावर हास्याची आणि समाधानाची लकेर उमटते. संपूर्ण कुटुंबाचा बंध अधिकाधिक घट्ट करण्यासाठी असे क्षण आयुष्यात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच साध्य करण्यासाठी प्रवाह पिक्चर ही नवी वाहिनी सुरु करण्यात आली आहे. नव्याकोऱ्या सिनेमांचा खास नजराणा सादर करत कुटुंबाला एकत्र आणण्याचे हे खास क्षण आपल्या आयुष्यात घेऊन येणार आहे डिस्ने स्टारची नवी चित्रपट वाहिनी ‘प्रवाह पिक्चर’.

नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी मराठी चित्रपटसृष्टीतले सर्व दिग्गज कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे दर रविवारी नव्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चर ही वाहिनी करणार आहे. मराठी चित्रपट वाहिनीत असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे. त्यामुळे प्रवाह पिक्चर या वाहिनीच्या माध्यमातून चंदेरी दुनियेचं सोनेरी पर्व खऱ्या अर्थाने सुरु होत आहे.

‘प्रवाह पिक्चर या नव्याकोऱ्या वाहिनीच्या माध्यमातून प्रवाह ब्रॅण्डचा विस्तार करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  या वाहिनीच्या माध्यमातून मराठी सिनेमा साजरा करण्याची आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची संधी मिळत आहे. या नव्योकोऱ्या वाहिनीच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षकांना आपल्या आवडत्या सिनेमांचा आनंद लुटता येईल.

दर्जेदार मनोरंजनाच्या शोधात असलेल्या मराठी कुटुंबासाठी प्रवाह पिक्चर ही वाहिनी हक्कांचं दालन असेल याची आम्हाला खात्री आहे अशी भावना नेटवर्क एंटरटेनमेंट चॅनल्स आणि डिस्ने स्टारचे प्रमुख केविन वाझ यांनी व्यक्त केली.’

प्रवाह पिक्चरवर प्रीमियर्सचा हा खजिना 'पावनखिंड' या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमापासून सुरु होणार आहे. १९ जूनला हा धमाकेदार सिनेमा पहाता येईल. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. यासोबतच हेमंत ढोमे दिग्दर्शित मल्टीस्टारर 'झिम्मा' हा आणखी एक सुपरहिट चित्रपट प्रवाह पिक्चरवर पहाता येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा 'कधी आंबट कधी गोड' आणि 'प्रवास' या दोन सिनेमांची देखिल प्रवाह पिक्चरवर खास पर्वणी असेल. सुपरस्टार स्वप्नील जोशीचा 'बळी', महेश मांजरेकर यांचा 'ध्यानीमनी', मल्टीस्टारर आणि समीक्षकांनी प्रशंसित 'कारखानीसांची वारी'  येत्या काही आठवड्यांत प्रवाह पिक्चर वाहिनीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येतील. तुमचे आवडते चित्रपट पहायचे राहून गेले असतील तर काळजी नसावी. प्रवाह पिक्चर आता हा आनंद थेट तुमच्या घरी घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे हे चित्रपट वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर म्हणून फक्त प्रवाह पिक्चरवर प्रक्षेपित केले जातील आणि हेच या वाहिनीचं ठसठशीत वेगळेपण आहे.

दर रविवारी दाखवण्यात येणाऱ्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर्ससोबतच प्रवाह पिक्चरवर दररोज ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडीने परिपूर्ण सुपरहिट चित्रपटांचा आनंद लुटता येईल. तेव्हा मनोरंजनाची ही अनोखी दुनिया अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. चला पिक्चरला जाऊया.