राज इरमालीचं 'दिसतंय मॅाडल भारी' हे धमाल गाणं प्रदर्शित....

राज इरमालीचं 'दिसतंय मॅाडल भारी' हे धमाल गाणं प्रदर्शित....

राज इरमालीचं 'दिसतंय मॅाडल भारी' हे धमाल गाणं प्रदर्शित....

* प्रतिनिधि

          आजचा जमाना व्हिडीओ अल्बम्सचा आहे. सिंगल्स आणि व्हिडीओ अल्बम्सच्या विश्वात रमलेल्या तरुणाईला काही युट्यूबर्सची गाणी नेहमीच खुणावत असतात. अशा युट्यूबर्सच्या नवनवीन गाण्यांची फॅालोअर्स आतुरतेनं वाट पहात असतात. या युट्यूबर्सच्या यादीत राज इरमाली हे नाव सध्या आघाडीवर आहे. मिलियन्स फॅालोअर्स असणाऱ्या राजनं आजवर रसिकांना वेगवेगळ्या मूडमधली धमाल गाणी दिली आहेत. अबालवृद्धांना आपल्या संगीताच्या तालावर ठेका धरायला लावलं आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या गाण्यांना रसिकांना भावणाऱ्या संगीताचा साज चढवणं हे राजच्या क्रिएटीव्हीटीचं गुपित मानलं जातं. याच राज इरमालीचं आता नवं कोरं गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे.

      निर्माते अनिल गोविंद पाटील यांची निर्मिती असलेलं 'दिसतंय मॅाडल भारी...' हे नवं गाणं राजनं नुकतंच आपल्या युट्यूब चॅनलवर लाँच केलं आहे. पवन केणे आणि आघाडीची युट्यूब एन्फ्युएन्जर कोमल खरात यांच्यावर 'दिसतंय मॅाडल भारी...' हे गाणं शूट करण्यात आलं आहे. नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेल्या, गुलाबी रंगाची उधळण करत प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या या गाण्याच्या पोस्टरवर उत्कंठा वाढवणारे पवन आणि कोमल यांचे मनमोहक चेहरे पहायला मिळतात. राज इरमालीची प्रस्तुती असलेलं हे गाणं शंभू आणि आरोही प्रभूदेसाई यांच्या साथीनं राजनं स्वत: गायलं आहे. बॅाब यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. 

       'दिसतंय मॅाडल भारी...' या गाण्याबाबत राज म्हणाला की, हे गाणं केवळ तरुणाईलाच नव्हे तर सर्व वयोगटातील संगीतप्रेमींच्या मनावर मोहिनी घालणारं आहे. प्रेमाची नवी व्याख्या या गाण्याच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रेम ही शब्दातीत असलेली भावना या गाण्यात तितक्याच अलवारपणे सादर करण्यात आली आहे. कोमल खरातनं आपल्या अदाकारीनं संगीतप्रेमींना भुरळ पाडली आहे. पवन केणेनंही आपला वेगळा चाहता वर्ग तयार करण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळं या दोघांची उपस्थिती 'दिसतंय मॅाडल भारी...' या अल्बमला एका वेगळ्या उंचीवर नेणारी ठरणार आहे. शंभू आणि आरोही यांनी गायनाच्या माध्यमातून या गाण्यातील शब्द आणि भावना यांचा संगम घडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळं अल्पावधीतच हे गाणं यापूर्वीच्या आमच्या सर्व गाण्यांचा रेकॅार्ड मोडीत काढेल याची खात्री असल्याचंही राज म्हणाला.