अभिनेत्री पूजा कातुर्डेचा नवा नाट्यानुभव ‘रविवार डायरीज’

अभिनेत्री पूजा कातुर्डेचा नवा नाट्यानुभव ‘रविवार डायरीज’

अभिनेत्री पूजा कातुर्डेचा नवा नाट्यानुभव ‘रविवार डायरीज’

* प्रतिनिधि

        अनेक मालिकांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री पूजा कातुर्डे वेगळा नाट्यानुभव देणार आहे. चैतन्य सरदेशपांडे लिखीत -दिग्दर्शीत 'रविवार डायरीज' या नाटकात पूजा दिसून येणार आहे. पूजा आणि तिच्या मित्रांनी मिळून हा नाट्यानुभव आणला आहे.

 पूजा या नाटकाबद्दल सांगते, “रविवार डायरीज हा वेगळा प्रयोग आम्ही केला आहे. आपण सोमवार ते शुक्रवार आपलं काम करतो आणि वीकेण्डला पार्टी करतो. प्रत्येक जण संपूर्ण आठवडा रविवार कधी येतो हे पाहात असतो. आपण सगळ्याच प्रकारे एका चक्रात अडकलो असतो. त्यावरच रविवार डायरीज हे नाटक आहे.”

एका माणसाला शर्ट घ्यायचा असतो, त्यासाठी तो मॉलमध्ये जातो. मनासारखा शर्ट शोधण्यासाठी तो बराच प्रयत्न करत असतो. त्यासाठी तो फक्त शर्ट नसतो तर अपेक्षा आणि स्वप्न असतात. त्यासाठी तो मॉलमध्ये रात्र घालवतो. त्यातून त्याला काय मिळतं हे दाखवणारा हा नाट्यानुभव आहे. हे ठराविक साच्यातील नाटक न करता नाट्यवाचन, नाट्यानुभव असा हा वेगळा प्रयोग आहे.“हे नाटक प्रत्येकाला आपलंसं वाटणारं आणि प्रत्येक जण यातून काहीतरी घेऊन जाणारं आहे”,असं पूजा सांगते.  


या नाटकाचं लेखन दिग्दर्शन चैतन्य सरदेशपांडेनी केलं आहे. तर पूजा सोबत यात अभिनेत्री दीप्ती लेलेही आहे. शुक्रवारी याचा पहिला प्रयोग अंधेरीत होणार आहे. त्या शिवाय पुणे, नाशिक,धुळे इथेही नाटकाचे प्रयोग होणार आहेत. 

पूजा कातुर्डेने आत्तापर्यंत अहिल्या बाई होळकर, गणपती बाप्पा मोरया, विठू माऊली, बाकरवडी, सांग तू आहेस का? अशा मालिकांमध्ये काम केले आहे.