मृणाल कुलकर्णी यांची प्लॅनेट मराठी ओटीटी परिवारात एन्ट्री : मराठी वेब कंटेंट सर्वोच्च शिखरावर पोहचवण्याचं स्वप्न...!
मृणाल कुलकर्णी यांची प्लॅनेट मराठी ओटीटी परिवारात एन्ट्री : मराठी वेब कंटेंट सर्वोच्च शिखरावर पोहचवण्याचं स्वप्न...!
* प्रतिनिधि
चित्रपट आणि मालिका अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती मृणाल कुलकर्णी प्लॅनेट मराठी ओटीटी, अ विस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, यांच्या संस्थापक मंडळाचा भाग म्हणून सामील झाल्या आहेत. मराठी कंटेंटला सर्वोच्च स्थानी घेऊन जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ‘प्लॅनेट मराठी’च्या ध्येयाशी सुसंगत दृष्टीकोनामुळे मृणाल या संस्थेत सहभागी झाल्या आहेत.
मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात उत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शक आणि पटकथा लेखन असा अनेक दशकांचा अनुभव असलेल्या मृणाल, आता जगातील पहिल्या वहिल्या मराठी ओटीटी माध्यम असलेल्या ‘प्लॅनेट मराठी’च्या यशस्वी वाटचालीत त्यांच्या मार्गदर्शनाने भर पडेल, असा विश्वास व्यक्त होतोय. ‘अवंतिका’, ‘यलो’, ‘फर्जंद’, ‘ये रे ये रे पैसा’ या आणि अशा अनेक चित्रपट आणि मालिकांमधील दमदार भूमिका, ‘रमा माधव’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं..’ आणि ‘ती आणि ती’ यांसारख्या चित्रपटांच दिग्दर्शन आणि पटकथा लेखनातून मृणाल यांनी त्यांचं वेगळेपण नेहमीच सिद्ध केलं आहे. तर, ‘सोनपरी’ सारख्या अजरामर भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचंही विशेष कौतुक होतं आहे. पडद्यावरील आणि पडद्यामागील गोष्टींचा अनुभव आणि कौशल्य प्लॅनेट मराठीच्या भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण आणि कलाटणी देणारा ठरणारं आहे.
‘प्लॅनेट मराठी ओटीटी’मधील सहभागाबद्दल मृणाल सांगतात, “हे पद स्वीकारणं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे, असं मला वाटतं. आपला सर्वोत्तम कंटेंट निर्भीडपणे जगासमोर मांडता येणं ही वेब विश्वाची खासियत आहे. ‘प्लॅनेट मराठी’ हे जागतिक दर्जाचे व्यासपीठ आहे. आजवर वेगवेगळे विषय आणि उतमोत्तम कंटेंट देऊन ‘प्लॅनेट...’ने अल्पावधीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कुटुंबातील माझा सहभाग ही माझ्यासाठी सुखावणारी गोष्ट आहे. माझ्या अनुभवांमधून आणि प्रयत्नांतून ‘प्लॅनेट..’च्या बरोबर माय मराठीचा झेंडा अटकेपार घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्नशील असेन. शिवाय, येत्या काळात सर्वोत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यासाठी सज्ज आहोत.”
निर्माते आणि ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर या नियुक्तीबद्दल म्हणतात, “मृणाल कुलकर्णी, यांसारख्या मनोरंजन विश्वातील दिग्गज आणि तज्ज्ञ व्यक्तीचा आमच्या कुटुंबात सहभाग होणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मृणाल यांच्या सहभागामुळे आम्ही हे ओटीटी अधिक सक्षम आणि मनोरंजनपूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याकडील व्यावसायिकता, नाविन्य, सादरीकरणातील तीक्ष्ण भावना या सगळ्याचा आमच्या वाटचालीसाठी उपयोग होईल. त्यांचा अनुभव आणि दूरदृष्टी यांमुळे आम्हाला काम करण्यास नवी उर्जा मिळेल. त्यामुळे मृणालताई आमच्या कुटुंबात येणं हा आमच्यासाठी बहुमान आहे.”, असं मी म्हणेन.
मृणाल कुलकर्णी जून २०२२ पासून या त्यांच्या नवीन कामाची एका नव्या भूमिकेतून सुरुवात करणार आहेत. जगातील पहिलं मराठमोळ ओटीटी म्हणून नावारूपास आलेल्या ‘प्लॅनेट मराठी’ प्रसिद्धीच्या सर्वोच्च स्थानी आहे. रानबाजार, जून, अनुराधा अशा हटके कलाकृतीनंतर अनेक उतमोत्तम कलाकृतीसह ‘प्लॅनेट मराठी’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे. खऱ्या अर्थाने जागतिक व्यासपीठ बनण्याची आणि मराठी कंटेंट आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्लॅनेट मराठी ओटीटी दर्जेदार संघ आणि व्यवस्थापन एकत्र आणण्यात आणि उत्तम कथा, पात्र, तंत्रज्ञ आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात कोणतीही कसर सोडत नाही, यात काही शंका नाही.