HAR HAR MAHADEV : झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या ट्रेलरने जिंकली प्रेक्षकांची मने....
HAR HAR MAHADEV : झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या ट्रेलरने
जिंकली प्रेक्षकांची मने....
_ अवघ्या काही तासांतच मिळवले लाखो व्ह्युज, ट्विटरवरही ट्रेंडमध्ये
* सिने प्रतिनिधि
‘हर हर महादेव’ अशी गगनभेदी गर्जना करत झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ट्रेलर आला आणि तमाम प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला. सोमवारी रात्री या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा सोहळा मुंबईत पार पडला. त्यानंतर लगेच हा ट्रेलर समाजमाध्यमांवर प्रदर्शित करण्यात आला आणि अवघ्या काही तासांतच प्रथम क्रमांकावर ट्रेंड होत, तो वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरला. केवळ मराठीच नाही तर इतर भाषांतील ‘हर हर महादेव’च्या ट्रेलरलाही असाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी आणि हिंदी ट्रेलरला युट्युबवर अवघ्या काही तासांतच वीस लाखांच्यावर व्ह्युज मिळाले असून ट्विटरवरही हजारो ट्विट्समुळे तो प्रथम क्रमाकांवर ट्रेंड करण्यात यशस्वी झाला. तामिळ चित्रपटसृष्टीत मक्कल सेल्वन म्हणजे सामान्य लोकांचा नायक अशी ओळख असलेल्या सुपरस्टार विजय सेथुपती यांनीही या चित्रपटाचा तामिळ ट्रेलर आपल्या ट्विटर हॅंडलवरून शेअर केला, जो अनेक जणांनी रिट्विटही केला आहे. सुबोध भावे यांनी अतिशय समंजसपणे साकारलेली शिवाजी महाराजांची करारी बाण्याची भूमिका आणि दमदार व्यक्तिमत्व असलेल्या शरद केळकर यांनी साकारलेली बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेचं दर्शन या ट्रेलरमधून होत असून या दोन्ही अभिनेत्यांना प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे. अंगावर शहारा आणणारे लढाईचे दृश्य आणि त्याच्या जोडीला त्याच ताकदीच्या संवादांनी विस्मयकारक अनुभव दिल्याच्या प्रतिक्रिया अनेकजण समाजमाध्यमांवर देत आहेत.
अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला आणि सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे यांच्या अभिनयाने सजलेला ‘हर हर महादेव’ येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून भारतभरात प्रदर्शित होत आहे. सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग ऍन्ड फिल्म्स आणि झी स्टुडियोजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच मुंबईत पार पडला. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे याप्रसंगी म्हणाले की, “हे स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा असं आपण नेहमी ऐकतो, वाचतो. त्याप्रमाणेच मी ही भूमिका साकारावी, ही माझी किंवा दिग्दर्शकाची नाही तर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती असं माझं मत आहे. बावीस वर्षांपूर्वी जेव्हा मी मुंबईत आलो होतो, स्ट्रगल करत होतो त्यावेळी एका मालिकेसाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी ऑडीशन दिली होती. त्यावेळी माझी निवड झाली नाही. महाराजांची ही भूमिका करण्यासाठी मला तब्बल २२ वर्षे वाट बघावी लागली. कदाचित महाराजांचीच ही इच्छा असेल की, मी माणूस म्हणून अजून प्रगल्भ व्हावं, अभिनेता म्हणून या भूमिकेसाठी अधिक तयार व्हावं, म्हणूनच एवढ्या कालावधीनंतर ही भूमिका माझ्याकडे आली. या भूमिकेला मी पूर्णपणे समर्पणाची भावना दाखवली म्हणूनच ती साकारणं शक्य झालं.”
तर या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची बाणेदार भूमिका साकारणारे दमदार अभिनेते शरद केळकर म्हणतात, “माझ्या कारकिर्दीमधला हा आजवरचा सर्वात मोठा चित्रपट आहे असं मी मानतो. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्याचं भाग्य मला मिळालं. मी स्वतःला कायम छत्रपतींचा मावळा समजतो. त्यामुळे बाजीप्रभूंची ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. या भूमिकेमुळे मला मराठी चित्रपटांमध्ये एक नवी ओळख मिळेल, असा विश्वास आहे.”
हर हर महादेव चित्रपटाच्या कथेबद्दल लेखक दिग्दर्शक अभिजीत देशपांडे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तिमत्वाचा विचार करताना मला एका गोष्टीचं कायम कुतुहल वाटायचं की, महाराजांमध्ये नेमकी अशी काय गोष्ट होती ज्यासाठी हजारो मावळे आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांच्यासाठी लढायचे. यावर अभ्यास केल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती ही की, हे केवळ एक राजा आणि त्याचं सैनिक एवढंच नातं नव्हतं. हे नातं होतं माय माऊलीचं आणि तिच्या लेकराचं, हे नातं होतं श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं, हे नातं होतं प्रभू श्रीराम आणि हनुमानाचं. महाराजांच्या व्यक्तिमत्वातली हीच गोष्ट मला भावली. ‘हर हर महादेव’ ही केवळ लढाई किंवा पराक्रमाची गोष्ट नाहीये तर ती जाणत्या राजाचं त्याच्या रयतेवर, शिलादारांवर असलेल्या विश्वासाची आणि प्रेमाची गोष्ट आहे. या भावना वैश्विक आहेत त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक भाषेतील प्रेक्षकांना मनापासून भावेल, असा विश्वास मला आहे. ”
याप्रसंगी झी स्टुडियोजचे चिफ बिझनेस ऑफिसर शारिक पटेल म्हणाले, “मराठी चित्रपटांमध्ये सतत काही तरी नवीन करण्याचा पायंडा झी स्टुडिओजने पाडलेला आहे. आताही ‘हर हर महादेव’ आम्ही पाच भारतीय भाषांमधून प्रदर्शित करतोय. मराठीमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच होतोय. या चित्रपटाच्या टिझरला इतर भाषांमधूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे हा चित्रपट सर्वच भाषांमध्ये स्वीकारला जाईल, याबद्दल पूर्ण खात्री आहे.”
हर हर महादेव हा निर्माते आणि दिग्दर्शकासाठीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याबद्दल झी स्टुडियोजचे मंगेश कुलकर्णी म्हणाले की, ‘’स्वप्न हे सत्यात तेव्हाच उतरतं जेव्हा त्यात अनेकजण सामिल होत जातात. हा चित्रपटही आम्हा सर्वांच्या स्वप्नाचा एक सुंदर प्रवास आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते कधीच मर्यादित नव्हते. भारतभरातच नाही तर जगभरातील लोकांसाठी ते प्रेरणादायी आहेत. त्यामुळेच हा चित्रपट त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे.”
हर हर महादेव या चित्रपटात पडद्यावर ज्याप्रमाणे कसलेल्या कलाकारांची टीम आहे त्याचप्रमाणे पडद्यामागेही तेवढ्याच कसलेल्या तंत्रज्ञांच्या टीमने यावर काम केलंय. यातील सर्व कलाकारांच्या लूक डिझाईनचे काम केले आहे प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी तर वेशभूषेची बाजू सांभाळली आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते नचिकेत बर्वे यांनी. अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांसाठी छायालेखन करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते डीओपी त्रिभुवन बाबू सदिनेनी यांनी ‘हर हर महादेव’चे छायादिग्दर्शन केले आहे. हितेश मोडक यांचे जबरदस्त संगीत असलेल्या या चित्रपटाची गीते मंदार चोळकर आणि मंगेश कांगणे यांनी लिहिली आहेत.
झी स्टुडियोजच्या वतीने येत्या २५ ऑक्टोबरला भारतभरात प्रदर्शित होणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी दिवाळीची विशेष भेट ठरणार आहे.