गोष्ट एका पैठणीची , ‘जून'ला राष्ट्रीय पुरस्कार
![गोष्ट एका पैठणीची , ‘जून'ला राष्ट्रीय पुरस्कार](https://pen-n-lens.in/uploads/images/2022/07/image_750x_62dab699e69ff.jpg)
गोष्ट एका पैठणीची , ‘जून'ला राष्ट्रीय पुरस्कार
* प्रतिनिधि
चित्रपट क्षेत्रातील विविध विभागातील मान्यवरांना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार शंतनु गणेश रोडे दिग्दर्शित 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला प्रदान करण्यात आला असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्पेशल ज्युरी मेंशन अवॉर्ड 'जून' चित्रपटासाठी सिध्दार्थ मेनन याला मिळाला आहे.
'गोष्ट एका पैठणीची' आणि 'जून' या दोन्ही चित्रपटांची निर्मिती 'प्लॅनेट मराठी'ची असून गोष्ट 'एका पैठणीची' मध्ये सायली संजीव आणि सुव्रत जोशी प्रमुख भूमिकेत आहे. तर या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग, चिंतामणी दगडे यांनी, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाईड प्रोड्कशन या बॅनर अंतर्गत केली आहे.
सायली संजीव म्हणते, "चित्रपटातील कामाचे चीज झाले आहे. चित्रपटासाठी मी विशेष मेहनत घेतली आहे. माझ्यासाठी चित्रपट खूप स्पेशल आहे. मी हा पुरस्कार माझ्या वडिलांना समर्पित करते." तर चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनु रोडे म्हणतात, ‘’माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. याचे श्रेय संपूर्ण टीमला जाते. सगळ्यांनीच यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि आज स्वप्न पूर्ण झाले.’’
पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ मेनन म्हणतो, "मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद होतोय. स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटतेय. हा पुरस्कार मी आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला समर्पित करतो. मला 'जून' चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला याचा सर्वात जास्त आनंद आहे.''सुहृद गोडबोले, वैभव खिस्ती दिग्दर्शित या चित्रपटाची कथा निखिल महाजन यांची आहे.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "प्लॅनेट मराठी नेहमीच दर्जेदार आशय बनवण्याच्या प्रयत्नात असते. या दर्जेदार आशयाच्या आधारावरच प्लॅनेट मराठीच्या दोन चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. सर्वांसाठीच हा आनंद देणारा क्षण आहे. हे पुरस्कार आमच्या कामासाठी पोचपावती आहे. यापुढे आणखी दर्जेदार चित्रपट बनवण्याचे प्रयत्न करू.