'भिरकीट'ची संगीतमय मेजवानी प्रेक्षकांच्या भेटीला
!['भिरकीट'ची संगीतमय मेजवानी प्रेक्षकांच्या भेटीला](https://pen-n-lens.in/uploads/images/2022/05/image_750x_6286883b79ae0.jpg)
'भिरकीट'ची संगीतमय मेजवानी प्रेक्षकांच्या भेटीला
* अमित मिश्रा
अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' हा चित्रपट १७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धमाल विनोदी आणि कौटुंबिक नाते यांच्या सोबतच या चित्रपटात अपल्याला जबरदस्त संगीत ऐकायला मिळणार आहे.
'भिरकीट' च्या टिझर आणि पोस्टरने आधीच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता या चित्रपटातील गाणी रसिकांच्या भेटीला आली असून हा सांगितिक सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘लाईन दे मला’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या गाण्यात मोनालिसा बागल आणि तानाजी गालगुंडे यांची प्रेमकहाणी सोबतच रोमँटिक डान्सही पाहायला मिळत आहे. या गाण्याला मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले असून या गाण्याचे बोल नकास अजीज ,आनंदी जोशी यांचे आहेत. मनाला भिडणारे ‘आसवांची’ आणि ‘गॉगल’ ही ठसकेदार लावणीही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील सर्व गाणी मंगेश कांगणे यांनी लिहिली असून ‘गॉगल’ हे गाणे उर्मिला धनगर, मंगेश कांगणे यांनी गायले आहे. तर ‘आसवांची’ हे भावनिक गाणे शैल हाडा यांनी गायले आहे.
‘भिरकीट’चे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात," हा एक धमाल विनोदी चित्रपट तर आहेच, शिवाय या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी आहेत. ‘लाईन दे मला’ या गाण्यात तानाजी गालगुंडे प्रथमच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची सर्व गाणी चित्रपटाच्या कथेला अनुसरून शब्दबद्ध करण्यात आली आहेत."
या वेळी अनुप जगदाळे यांनी ‘लाईन दे मला’ या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले, ‘’हे संपूर्ण गाणे तानाजी आणि मोनालिसा यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात आम्ही रोमान्ससोबतच धमालही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन तानाजीला अनुसरून केले आहे. त्याने अतिशय उत्तमरित्या हे नृत्य सादर केले आहे, हे गाणे पाहताना त्याचा अनुभव येईलच. तानाजीनेही या नृत्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.
क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कथा अनुप जगदाळे तर पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत ,छायाचित्रण मीर आणि संकलन फैजल महाडिक यांचे आहे. शैल-प्रितेश या हिंदी जोडीचे धमाल संगीत लाभलेल्या या चित्रपटाच्या वितरणाची धुरा युएफओने सांभाळली आहे.