'सनी' चित्रपटातील 'मी नवा’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
मातीतुन पुन्हा उगवणारा मी नवा…
'सनी' चित्रपटातील 'मी नवा’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
* सिने प्रतिनिधि
घरापासून दूर असणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट सांगणारा 'सनी' चित्रपट प्रदर्शनच्या वाटेवर असतानाच आता या चित्रपटातील एक हृदयस्पर्शी गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. 'मी नवा' असे बोल असणाऱ्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांचे गीत लाभले असून सौमिल -सिद्धार्थ यांनी संगीत दिलं आहे. शिवम महादेवन यांच्या आवाजातील हे गाणं मनाला स्पर्शून जाणारं आहे.
घराची, नात्यांची, जबाबदारीची जाणीव झालेल्या 'सनी'चं आयुष्य आता एका नवीन वळणावर येत आहे. 'वादळागत आलो मी अन झुळूक होऊन चाललो', असं म्हणणाऱ्या 'सनी'ला आता घरचे वेध लागले असून स्वच्छंदी आयुष्य जगणारा 'तो' आता गांभीर्यानं आयुष्याकडे पाहताना दिसतोय. गाण्याचे बोल थेट मनाला भिडणारे आहेत. आतापर्यंत पाहिलेल्या 'सनी'पेक्षा एक वेगळा आणि नवा 'सनी' यात दिसत आहे.
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, '' या चित्रपटातील हे माझं आवडतं गाणं आहे. मुळात या गाण्याचे बोल खूप अर्थपूर्ण आहेत. 'नवा मी'च्या रेकॉर्डिंगदरम्यान नकळत आम्ही आमच्या जुन्या आठवणींमध्ये रमलो. हे गाणं माझ्या आयुष्याला समर्पक आहे. ज्यावेळी मी घरापासून लांब होतो, त्या काळात माझ्यातही खूप बदल झाले. तेव्हा 'नवा मी' स्वतःला गवसलो. त्यामुळे हे गाणं खूप खास आहे.''
क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत. या चित्रपटात ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख आणि अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.