गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'नाद - द हार्ड लव्ह'चा फर्स्ट लूक प्रदर्शित...
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'नाद - द हार्ड लव्ह'चा फर्स्ट लूक प्रदर्शित...
* सिने प्रतिनिधि
गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर नवोन्मेषाची गुढी उभारून हिंदू नववर्षाचं स्वागत करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. आजही त्या परंपरेचं मोठ्या उत्साहानं, जल्लोषात आणि आत्मीयतेनं पालन केलं जातं. या दिवशी मराठी सिनेसृष्टीतही बऱ्याच नावीन्यपूर्ण गोष्टी घडत असतात. 'नाद - द हार्ड लव्ह' या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसाचं औचित्य साधत रिलीज करण्यात आलं आहे.
शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांची निर्मिती असलेल्या 'नाद - द हार्ड लव्ह' चित्रपटाचे निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर आहेत. आजवर 'मिथुन', 'रांजण', 'बलोच' अशा विविध विषयांवरील आव्हानात्मक चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या प्रकाश जनार्दन पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'देवमाणूस' या गाजलेल्या छोट्या पडद्यावरील मराठी मालिकेत शीर्षक रोल साकारून महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत रिलीज करण्यात आलेल्या फर्स्ट लूकमध्ये किरणच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिंबळे हे कलाकारही आहेत. यात किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळतो, जो रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. त्याच्या जोडीला असलेल्या सपना माने आणि यशराज डिंबळे यांच्या या चित्रपटातील व्यक्तिरेखाही महत्त्वपूर्ण आहेत. हि एक परिपूर्ण प्रेमकथा आहे. प्रेमकथेच्या जोडीला समाजात घडणाऱ्या घटनांवर प्रकाशझोत टाकणारं कथानक यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रिलीज करण्यात आलेल्या फर्स्ट लूकबाबत दिग्दर्शक प्रकाश पवार म्हणाले की, 'नाद - द हार्ड लव्ह' हा चित्रपट खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना खूप काही वेगळं देणारा आहे. 'द हार्ड लव्ह' ही टॅगलाईनच खूप काही सांगणारी आहे. गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी या चित्रपटाचा फर्स्ट लूक मायबाप रसिकांच्या भेटीला आल्याचा एक वेगळाच आनंद असल्याची भावनाही पवार यांनी व्यक्त केली आहे.
आशयघन कथानक, सहजसुंदर अभिनय आणि नेत्रसुखद सादरीकरण ही 'नाद' चित्रपटाची वैशिष्ट्ये ठरणार आहेत. संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. डॉ. विनायक पवार यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. याखेरीज विनायक यांनी वैभव देशमुख यांच्यासोबत 'नाद'साठी गीतलेखनही केलं आहे. संगीतकार पंकज पडघन यांनी या गीतांना संगीत देण्याचं काम केलं आहे. या गाण्यांवर सिद्धेश दळवीने कोरिओग्राफी केली आहे. सिनेमॅटोग्राफी डिओपी अमित सिंह यांनी केली असून, सतीश चिपकर यांनी कला दिग्दर्शनाचं काम पाहिलं आहे. निगार शेख यांनी वेशभूषा केली असून कास्टिंग डायरेक्टरची जबाबदारी रमेश शेट्टी यांनी सांभाळली आहे. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सुजित मुकटे यांनी सांभाळली असून, आमिरा शेख या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह हेड आहेत. लाइन प्रोड्युसर आहेत संकेत चव्हाण.