सोनियाजींनी पुकारलेल्या 'भारत जोडो' या आंदोलनाच्या धर्तीवर आगामी निवडणुकीत संपूर्ण मुंबईमध्ये 'भारत जोडो - मुंबई जोडो' हे आंदोलन सुरु करणार - भाई जगताप....
सोनियाजींनी पुकारलेल्या 'भारत जोडो' या आंदोलनाच्या धर्तीवर आगामी निवडणुकीत संपूर्ण मुंबईमध्ये 'भारत जोडो - मुंबई जोडो' हे आंदोलन सुरु करणार - भाई जगताप....
* प्रतिनिधि
"आपण आज इथे जे नवसंकल्प शिबीर आयोजित केलेले आहे, ते काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी दाखवलेल्या नवसंकल्पाची दिशा आणि विचार मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहचविण्यासाठी आयोजित केलेले आहे. निरंकुश भाजप सरकारमध्ये आणि लोकतांत्रिक कॉंग्रेस पक्षामध्ये किती अंतर आहे, हे या शिबिरातून आपल्याला दिसून येते. देशाचा विकास करणे, तरुणांना रोजगार, लोंकांचे राहणीमान उंचावणे, देशासाठी कल्याणकारी योजना आणणे यासाठी प्रयत्न न करता, भाजप सरकार वेळोवेळी फक्त धर्माच्या नावाने गलिच्छ राजकारण करत आहे" असे विधान आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी केले.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई काँग्रेसतर्फे पनवेल येथे दोन दिवसीय नवसंकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी एच के पाटील बोलत होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एच के पाटील यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, खासदार कुमार केतकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, माजी खासदर भालचंद्र मुणगेकर, आमदार अमीन पटेल व झिशान सिद्दीकी, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, माजी आमदार बाबा सिद्दीकी, काँग्रेसचे राज्यसभा खासदारकीचे उमेदवार इमरान प्रतापगढी, AICC सचिव संपतकुमार, आशिष दुआ, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा अनिशा बागुल, तसेच मुंबई काँग्रेसचे सर्व आजी-माजी आमदार, नगरसेवक व काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एच के पाटील पुढे म्हणाले की, शिर्डीच्या साईबाबांनी सबका मालिक एक हा संदेश दिला होता. त्याच संदेशाप्रमाणे समानता, बंधुत्व, न्याय, सर्वभौमिक जिव्हाळा, भेदभाव न करता सामाजिक भावनेने जनतेची सेवा करणे हाच काँग्रेसचा मूळ उददेश राहिला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार असताना काँग्रेसच्या देशविधायक धोरणांमुळे देशातील 27 करोड गरीब जनता दारिद्र्यरेषेच्या वर जीवन जगत होती. पण मागील आठ वर्षांमध्ये केंद्रामध्ये भाजपचे सरकार असताना देशातील 14 करोड जनता पुन्हा दारिद्र्यरेषेखाली गेली आहे. मागील 75 वर्षांमध्ये कधी झाली नव्हती, ती देशाची अर्थव्यवस्था आता आयसीयू मध्ये गेल्यासारखी भासू लागली आहे. देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. मोठ्या दिमाखात भाजपने उज्वला योजना सुरू केली होती. पण वाढलेल्या गॅसच्या प्रचंड दरांमुळे आज पुन्हा एकदा ग्रामीण जनतेला जळणासाठी लाकूड वापरावे लागत आहे. देशाचा विकास करणे, रोजगार, लोंकांचे राहणीमान उंचावणे, देशासाठी कल्याणकारी योजना आणणे यासाठी प्रयत्न न करता, नरेंद्र मोदींचे सरकार वेळोवेळी फक्त धर्माच्या नावाने गलिच्छ राजकारण करत आहे. फक्त काँग्रेसचे विचार व काँग्रेसचे लोकतांत्रिक सरकारच या देशाला या गर्तेतून बाहेर काढू शकते. मुंबई काँग्रेसची स्तुती करताना एच के पाटील म्हणाले की, कोविड आणि लॉकडाऊन दरम्यान मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्याप्रकारे मुंबईकरांची सेवा केली, त्याला तोड नाही. तसेच मुंबईमध्ये सर्वाधिक 8 लाख डिजिटल मेम्बरशीप मुंबई काँग्रेसने केली आहे. पिंक मॅरेथॉन रन चे आयोजन करून स्त्रीशक्तीला प्रोत्साहन देण्याचे उल्लेखनीय काम देखील मुंबई काँग्रेसने केले आहे. याबाबत मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांचे मी अभिनंदन करतो.
राज्यसभेच्या निवडणुकीबद्दल बोलताना एच के पाटील म्हणाले की, आमचे उमेदवार इमरान प्रतापगढी नक्कीच निवडून येणार. आम्हाला कोणतीही चिंता नाही, आम्ही कोणत्याही दबावाखाली नाही. आमचा घोडेबाजाराला विरोध आहे. काँग्रेस कधीच घोडेबाजार करत नाही.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यावेळेस म्हणाले की, मागील आठ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील भाजप सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. बेरोजगारी आणि महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पण आज देशामध्ये केंद्रातील भाजप सरकारचा उत्सव सुरु आहे. कसला उत्सव सुरु आहे हा? काश्मीर मध्ये काश्मीर पंडितांच्या संपूर्ण गावाने पलायन केले. कमालीची गोष्ट आहे कि संपूर्ण देशामध्ये काश्मीर फाईल्स हा सिनेमा संपूर्ण चित्रपटगृहाची तिकिटे घेऊन मोफत दाखवला जात होता आणि संपूर्ण सोशल मीडियावर त्याची प्रसिद्धी केली गेली. आज त्याच काश्मीर ची आणि तिथे राहणाऱ्या काश्मिरी पंडितांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार आहे. आज आपल्या देशाला या अत्यंत वाईट अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी एका नवीन रस्ता दाखविण्याची गरज आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, की तो नवीन रस्ता उदयपूरच्या संकल्प शिबिरातून मिळाला. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी उदयपूर येथे झालेल्या संकल्प शिबिरातून मिळालेला तो रस्ता, ती दिशा, ती ऊर्जा मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपर्यन्त पोहचविण्यासाठी आपण आज या नवसंकल्प शिबिराचे आयोजन केले आहे. सोनियाजींनी उदयपूर येथील शिबिरामध्ये पुकारलेल्या 'भारत जोडो' या आंदोलनाच्या धर्तीवर आगामी निवडणुकीत संपूर्ण मुंबईमध्ये मुंबई काँग्रेसतर्फे सर्व 236 वॉर्डमध्ये आम्ही 'भारत जोडो - मुंबई जोडो' हे आंदोलन सुरु करणार आहोत.
काँग्रेसचे राज्यसभा खासदारकीचे उमेदवार इमरान प्रतापगढी यावेळेस म्हणाले की, मी महाराष्ट्राचाच एक भाग आहे. मला महाराष्ट्राची पूर्ण माहिती आहे. मी यापूर्वीही नांदेड, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्यांमध्ये फिरून निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार केला आहे आणि आताही मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मी सहभागी होऊन मी मुंबईत काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करणार आहे.