'सनी'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

'सनी'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

लांब गेल्यावरच जवळचं सापडतं :
'सनी'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

* सिने प्रतिनिधि

             'झिम्मा' चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर 'झिम्मा'ची टीम प्रेक्षकांसाठी आता एक नवीन भेट घेऊन आली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' लवकरच प्रदर्शित होणार असून नुकताच त्याचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट आहे. विविध भावनांनी भरलेला हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना 'सनी'ची कहाणी जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी'चे अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी 'सनी'चे निर्माते आहेत. तर संतोष खेर आणि तेजस्विनी पंडित सहनिर्माते आहेत. 

       एकंदर ट्रेलर पाहून लक्षात येते की कूल, बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगणारा 'सनी' जेव्हा शिक्षणासाठी घरापासून दूर परदेशात जातो, तेव्हा त्याची स्वावलंबी होण्यासाठीची धडपड यात दिसत आहे. सुखवस्तू घरातून आलेल्या 'सनी'ला परदेशातील परिस्थितीशी जुळवून घेताना त्रास होत आहे. अनेक गोष्टींना सामोरे जात असतानाच त्याला घरच्यांचे महत्व कळत आहे. लांब गेल्यावरच जवळचं सापडतं, असाच काहीसा अनुभव 'सनी'ला येत असल्याचे दिसतेय. 'सनी'ने अशी कोणती चूक केली, ज्याची त्याला अशी शिक्षा भोगावी लागत आहे, 'सनी'च्या मनातली तगमग नेमकी कसली आहे, सनी पुन्हा मायदेशी येणार की परदेशातच राहणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला   १८ नोव्हेंबरला मिळणार आहेत
 
          'सनी'बद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ". लांब गेल्यावरच काही गोष्टींची किंमत कळते, जाणीव होते आणि याच अनुभवातून माणूस सर्वार्थाने प्रगल्भ होतो. 'सनी'चा अनुभव मी स्वतःही घेतला आहे. मी स्वतः शिक्षणासाठी परदेशात असल्याने ही कथा माझ्याही खूप जवळची आहे. खरंतर कधीतरी घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट आहे. प्रत्येकाने कुटुंबासोबत पाहावा, असा 'सनी' आहे. आयुष्यातील गांभीर्य जाणून न घेता, बिनधास्त जगणाऱ्या 'सनी'ला परदेशात गेल्यावर आयुष्याची, नात्यांची किंमत कळते. विनोदी, धमाल आणि तरीही भावनिक असा हा चित्रपट आहे. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी 'झिम्मा'वर प्रेम केले तसेच प्रेम प्रेक्षक 'सनी'वरही करतील, याची मला खात्री आहे. ''