स्वयंपाकघरात उतरल्या 'तिघी' : ’तिखट मीठ फूड्स’ क्लाऊड किचनसोबत अनोखा उपक्रम

स्वयंपाकघरात उतरल्या 'तिघी' : ’तिखट मीठ फूड्स’ क्लाऊड किचनसोबत अनोखा उपक्रम

स्वयंपाकघरात उतरल्या 'तिघी' : ’तिखट मीठ फूड्स’ क्लाऊड किचनसोबत अनोखा उपक्रम

प्रतिनिधि

  जीजिविषा काळे दिग्दर्शित 'तिघी' हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर, नेहा पेंडसे -बायस, सोनाली कुलकर्णी यांच्या तिघींच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कणखर, स्वाभिमानी आणि भावविश्वाने समृद्ध स्त्रिया अशा या 'तिघी' पडद्यावर जशा दिसतात, तसाच प्रत्यय अलीकडे प्रत्यक्ष आयुष्यातही आला. 'तिघी' चित्रपटाच्या टीमने ‘तिखट मीठ फूड्स’ या महिलांनी चालवलेल्या क्लाऊड किचनला भेट देत एक हळवा, प्रेरणादायी आणि आनंदाने भरलेला दिवस अनुभवला. भारती आचरेकर, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी आणि दिग्दर्शिका जिजीविषा काळे यांनी या भेटीत मनापासून सहभाग घेतला.

'तिखट मीठ फूड्स' हा केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर घरबसल्या महिलांना रोजगार मिळावा, या उद्देशाने उभा राहिलेला उपक्रम आहे. स्वतःच्या पायावर उभं राहाण्याची जिद्द असलेल्या या महिलांच्या विचारांशी 'तिघी' चित्रपटाचा आशयही जुळणारा आहे. चित्रपटात जशा तीन स्त्रिया आपल्या आयुष्याचा लढा स्वतः देताना दिसतात, तशाच या खऱ्या आयुष्यातील स्त्रिया स्वतःचं विश्व उभारताना दिसतात. या भेटीत गप्पा, हशा, अनुभवांची देवाणघेवाण यासोबतच मदतीचा हातही पुढे करण्यात आला.

या खास दिवशी भारती आचरेकर यांनी स्वयंपाकघरात उतरून प्रत्यक्ष हातभार लावला, तर नेहा पेंडसे यांनी पॅकिंगची जबाबदारी सांभाळली. सोनाली कुलकर्णी आणि जिजीविषा काळे यांनीही महिलांसोबत खांद्याला खांदा लावून काम केलं. सगळ्यांनी मिळून बनवलेलं जेवण, शेअर केलेल्या भावना आणि एकमेकींना दिलेली शाबासकीची थाप यामुळे हा दिवस संस्मरणीय ठरला. विशेष म्हणजे, या क्लाऊड किचनच्या नफ्यातून अनाथ मुलींना जेवण देण्याचा उपक्रम राबवला जातो, ही बाबही टीमला भावून गेली. पडद्यावरच्या 'तिघी' आणि प्रत्यक्ष आयुष्यातील या जिद्दी स्त्रिया, या भेटीत दोघींनाही एकमेकींकडून नवं बळ मिळालं. कणखरपणा, माया आणि आनंद यांचा सुंदर संगम असलेला हा दिवस 'तिघी'च्या टीमसाठी खास ठरला.