'अनलॉक जिंदगी' चित्रपट ठरला नऊ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी...
'अनलॉक जिंदगी' चित्रपट ठरला नऊ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ....
_दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
* सिने प्रतिनिधि
महामारी काळातील भयाण वास्तवावर भाष्य करणाऱ्या 'अनलॉक जिंदगी' या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा रोमांचकारी ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहून या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली असून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहात आहेत. 'अनलॉक जिंदगी'ने आतापर्यंत शिकागो, टोरांटो, पिनॅकल, मेक्सिको, पॅरिस, न्यूयॉर्क, मिलान, लंडन, १३ अशा अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नामांकने मिळवली असून दोन पुरस्कारही आपल्या नावावर केले आहेत. त्यापैकी मिलान फिल्म अवॉर्ड्समध्ये 'बेस्ट नरेटिव्ह फिचर फिल्म' आणि पिनॅकल फिल्म अवॉर्ड्समध्ये 'बेस्ट फिचर फिल्म' या पुरस्काराने या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे.
या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक राजेश गुप्ता म्हणतात, " आमच्या 'अनलॉक जिंदगी' या चित्रपटाची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड होणे, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हे फक्त माझे एकट्याचे यश नसून संपूर्ण टीमचे यश आहे. हा चित्रपट त्या काळातील भयाण परिस्थितीवर भाष्य करणारा असून हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. हृदय पिळवटणारा हा काळ होता. माणसाचे मतपरिवर्तन करणारी ही कथा असून हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्याशी समरूप वाटतील.''
रियल रील्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजेश गुप्ता असून या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांनीच केले असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत. येत्या १९ मे रोजी 'अनलॉक जिंदगी' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.