'चंद्रमुखी' मधील कान्हा गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

'चंद्रमुखी' मधील कान्हा गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

'चंद्रमुखी' मधील 'कान्हा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला...


* प्रतिनिधि

सध्या सर्वत्र 'चंद्रमुखी'च्या घुंगरांचे बोल घुमत असून 'चंद्रमुखी' या चित्रपटाला प्रेक्षक, समीक्षक आणि सिनेसृष्टीमधून भरभरून प्रतिसाद मिळतं आहे. चंद्रालाही प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले, देत आहेत. चित्रपटातील भन्नाट गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर आता प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणार 'कान्हा' हे गाणं आपल्या समोर भेटीला आलं आहे. 

खरंतर 'चंद्रमुखी' या चित्रपटाबरोबरच, चित्रपटातील संगीतानेही सर्वांना भुरळ घातली आहे. या गाण्यात भगवान श्रीकृष्णाची भक्त असलेली चंद्रा तिच्या मनातील भावना कान्हापुढे व्यक्त करताना दिसत आहे. थेट मनाला भिडणारे हे गीत चंद्रा आणि दौलतराव यांच्यावर चित्रित करण्यात आले असून या गाण्याचे संगीत अजय-अतुल यांचे आहे. अजय गोगावले यांनी गायलेल्या 'कान्हा' या गाण्याला गुरु ठाकूर यांचे बोल लाभले आहेत. 

'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप आनंद होत आहे. आजही 'चंद्रमुखी'साठी 'चित्रपटगृहासमोर हाऊसफुल'चा बोर्ड लागत आहे. 'चंद्रा' या शीर्षकगीताने तर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आजही अनेक जण या गाण्यावर थिरकत आहेत. तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांकडून मिळणारे असे प्रेम पाहून खूप छान वाटतेय. या चित्रपटाची कथा तर दमदार आहेच. मात्र चित्रपटाचे संगीतही त्याच ताकदीचे आहे. चित्रपटातील गाण्यांचे श्रेय पूर्णपणे संगीत टीमला जात असले तरी सादर करण्यासाठी अमृतानेही खूप मेहनत घेतली आहे आणि सगळ्यात प्रसादचा सिंहाचा वाटा आहे. 'चंद्रमुखी'वर सर्वच स्तरातून होणारा कौतुकांचा वर्षाव पाहून प्रसाद,अमृता,आदिनाथ,अजय-अतुल, एकंदरच संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे दिसत आहे. 'कान्हा' हे गाणे सध्या प्रदर्शित करण्यात आले असून इतर गाण्यांप्रमाणे हे गाणेही रसिकांना भावेल.'' 

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत 'चंद्रमुखी' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. चिन्मय मांडलेकर यांची पटकथा-संवाद असलेल्या या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे यांच्यासोबतच मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, सुरभी भावे, राधा सागर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे.