'टकाटक २'चं मोशन पोस्टर रिलीज
'टकाटक २'चं मोशन पोस्टर रिलीज
* प्रतिनिधि
मराठी बॅाक्स ऑफिसवर तूफान गर्दी खेचणाऱ्या 'टकाटक' या मराठी चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या 'टकाटक २'ची रसिक खूप आतुरतेनं वाट पहात आहेत. १८ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'टकाटक २'चं मोशन पोस्टर आता रिलीज करण्यात आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत शेअर करण्यात आलेल्या 'टकाटक २'च्या मोशन पोस्टरमध्ये कलाकारांची धमाल पहायला मिळत आहे.
लेखक-दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेलं अनोखं मोशन पोस्टर रसिकांसोबतच संपूर्ण मनोरंजन विश्वाचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. रिलीज झाल्यानंतर अल्पावधीतच 'टकाटक २'च्या मोशन पोस्टरनं लक्षवेधी लाईक्स मिळवले असून, प्रेक्षकांची पसंती मिळवत बाजी मारल्याचं चित्र पहायला मिळत आहे. 'टकाटक २'च्या माध्यमातून रसिकांना पुन्हा एकदा एक फ्रेश कथानक अनुभवायला मिळणार आहे. 'टकाटक'च्या यशानंतर 'टकाटक २' जणू इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'टकाटक २'मध्येही प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असल्यानं गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक आणि मराठी रसिकांच्या लाडक्या अभिनेत्याची केमिस्ट्री रसिकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. मिलिंद कवडे यांनी नेहमीच आपल्या कलाकृतींद्वारे मनोरंजक कथानकाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश समाजापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. अॅडल्ट कॅामेडी असूनही प्रेक्षकांनी जसा 'टकाटक'मधील सामाजिक संदेश समजून घेऊन चित्रपट डोक्यावर घेतला तसाच 'टकाटक २' देखील घेतील असा विश्वास कवडे यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटात काय पहायला मिळणार आहे याची झलक दाखवणारं मोशन पोस्टर धमाल-मस्तीसोबत आणखी बरंच काही सांगणारं आहे.
'टकाटक २'मध्ये प्रथमेशसह अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आणि इतर कलाकारांच्याही भूमिका आहेत. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांची संकल्पना असलेल्या 'टकाटक २'ची कथा आणि पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. रसिकांची आवड ओळखून किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी यांनी प्रसंगानुरुप संवादलेखन केलं आहे. सिनेमॅटोग्राफी हजरत शेख वली यांनी केली असून अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. गीतकार जय अत्रेनं या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून, संगीतकार वरूण लिखतेनं संगीत देण्याचं काम केलं आहे. निलेश गुंडाळे यांनी या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
'टकाटक २' निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, नरेश चौधरी, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.