प्रार्थना बेहेरे आणि सयाजी शिंदे यांचा ‘रंगीत’ प्रदर्शित होतोय थेट 'अल्ट्रा झकास' ओटीटीवर!

प्रार्थना बेहेरे आणि सयाजी शिंदे यांचा ‘रंगीत’ प्रदर्शित होतोय थेट 'अल्ट्रा झकास' ओटीटीवर!
* प्रतिनिधि
आयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनवासवर पडलेला काळा रंग. अशा या विरहामागे एक रहस्यमय घटना असेल तर? एक रहस्यमय आणि रंगहीन घटना ‘रंगीत’या चित्रपटात दडून बसली आहे, जी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी आहे. ‘रंगीत’ दिनांक १७ मे २०२४ रोजी थेट 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना आजवर न मिळालेल्या एका थरारक चित्रपटाचा मनमुराद आस्वाद घेता येणार आहे.
चित्रपटाची कथा एका फाईन आर्ट्स महाविद्यालयाच्या आवारात फिरते. विरहाच्या नैराश्येमुळे कायम नशेत असणारा सिद्धार्थ महाविद्यालयच्या आवारात फिरत आहे. महाविद्यालयात नव्यानेच प्रवेश घेतलेल्या शिवाला आवारात एका स्त्रीच्या आत्म्याचा भास होत आहे. आत्म्याचा आणि सिद्धार्थच्या प्रियसीचा चेहरा एकच असल्याचं लक्षात येतं. पण त्याला अचानक सोडून गेलेली प्रियसी मरण पावली कशी याचा शोध सुरू होतो. तिच्या मरणाचं कारण भयंकर असून त्यामागील रहस्यमय कथा प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन प्रज्योत दिवाकरराव कडू यांनी केले असून मकरंद अनासपूरे, सयाजी शिंदे, भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहेरे या स्टार अभिनेत्यांनी चित्रपटात आपल्या अनोख्या भूमिका साकार केल्या आहेत.
“मराठी मातीतल्या चित्रपटांमध्ये अनेकानेक प्रयोग व्हावेत असं नेहमी वाटतं. अशाच एका प्रयोगातून जन्मलेला हा ‘रंगीत’चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजनाच्या शिखरावर पोहचवेल याची शास्वती वाटते. म्हणून ‘रंगीत’ सारखा चित्रपट थेट अल्ट्रा झकास ओटीटीवर प्रदर्शित करत आहोत.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.