अखेर 'बॉईज ३' मधील ‘तो’ चेहरा आला समोर
अखेर 'बॉईज ३' मधील ‘तो’ चेहरा आला समोर : विदुला चौगुलेचे चित्रपटसृष्टीत पदार्पण
* प्रतिनिधि
'बॉईज' आणि 'बॉईज २' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातला होता. धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर या धमाल त्रिकुटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली. आणि त्यात दोन्ही पर्वामध्ये धैऱ्या, ढुंग्या आणि कबीरच्या आयुष्यातील येणारी मुलगी हा एक वेगळाच विषय ठरला. प्रत्येक वेळी यात हॅण्डसम कबीरनेच बाजी मारली. ‘बॅाईज ३’च्या घोषणेपासूनच धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर यांच्यासोबत राडा घालायला कोण अभिनेत्री असणार, याची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर ‘ती’चा चेहरा समोर आला असून विदुला चौगुले ‘त्या’ मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
विदुला ‘बॅाईज ३’च्या निमित्ताने चित्रपटात पदार्पण करत आहे. आता ही विदुला या त्रिकुटाला भारी पडणार का? हे पाहण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
काही दिवसांपूर्वीच या तिघांच्या आयुष्यात आलेली ‘ती’ मुलगी सोशल मीडियावर झळकली होती. मात्र अर्धा चेहरा दिसत असल्याने ‘ती’ नक्की कोण, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर या चेहऱ्यावरून पडदा उठला असून आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती, विदुला नक्की कोणाच्या आयुष्यात येणार याची? तिच्या येण्याने या तिघांच्या आयुष्यात काय गडबड होणार की त्यांचे आयुष्य एका वेगळ्याच वळणावर जाणार? अर्थात या सगळ्यांची उत्तरे ‘बॅाईज ३’ पाहिल्यावरच मिळतील.
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ३' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
येत्या १६ सप्टेंबर रोजी प्रतीक लाड, पार्थ भालेराव आणि सुमंत शिंदे या त्रिकुटासह विदुला चौगुले चित्रपटगृहात दंगा घालायला येत आहेत.