'विषय हार्ड'च्या गाण्याच्या निमित्ताने तेलुगू चित्रपटसृष्टी आणि मराठी चित्रपटसृष्टी एकत्र...
'विषय हार्ड'च्या गाण्याच्या निमित्ताने तेलुगू चित्रपटसृष्टी आणि मराठी चित्रपटसृष्टी एकत्र...
* सिने प्रतिनिधि
महाराष्ट्राच्या अस्सल लाल मातीतील रांगड्या भाषेचा साज लेवून सजलेल्या 'विषय हार्ड' या चित्रपटातील 'येडं हे मन माझं...' हे प्रेमगीत नुकतंच सिनेरसिकांच्या भेटीला आलं आहे. अनोख्या प्रेमाची अनोखी कथा सांगणारा 'विषय हार्ड' हा मराठी चित्रपट येत्या ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बर्डबॅाय एन्टरटेन्मेंट आणि कोल्हापूर टॅाकिज या बॅनरखाली 'विषय हार्ड'ची निर्मिती गीतांजली सर्जेराव पाटील, सर्जेराव बाबूराव पाटील आणि सुमित पाटील यांनी केली आहे. सुमित यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, कथालेखनाची जबाबदारीही सांभाळली आहे. सोशल मीडियावर या प्रेमगीताला अफलातून पसंती मिळत असून या गाण्यानं संगीतप्रेमींना 'येड' लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
साहिल कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेले आणि सुदर्शन खोत यांनी शब्दबद्ध केलेले 'येडं हे मन माझं...' हे गाणे अदिती भवराजू आणि स्वतः साहिल यांनी गायिले आहे. अदिती भवराजू या तेलुगू चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय गायिका असून या गाण्याच्या निमित्ताने त्यांनी मराठीमध्ये पदार्पण केले आहे. गाण्याचे रेकॉर्डिंग हैदराबाद आणि यशराज स्टुडिओ, मुंबईमध्ये झाले आहे. या गाण्यात नायक-नायिकेच्या बालपणातील, शालेय जीवनातील आठवणींसोबतच तारुण्यातील गुलाबी प्रेमाचीही झलक पाहायला मिळते. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पर्ण पेठे आणि सुमित यांची लव्हेबल केमिस्ट्री ही या गाण्यातील जमेची बाजू आहे. एकीकडे पर्णचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज या गाण्यात पाहायला मिळतो, तर सुमितची शैलीही लक्ष वेधून घेते. हे गाणं म्हणजे या चित्रपटातील नायक-नायिकेच्या बालपणापासून तरुणपणापर्यंतच्या आठवणींचा जणू एक अल्बमच आहे. 'येडं हे मन माझं, न्हालं प्रेमामध्ये, बावरलं, सावरलं गं रंगलंय...' हे शब्द प्रेमाचा खराखुरा अर्थ सांगून जातात. या गाण्याचे छायाचित्रण अभिषेक शेटे आणि जय पारीख यांनी अतिशय सुरेखपणे केले आहे.
या गाण्याबाबत सुमित म्हणाले की, 'येडं हे मन माझं...' हे नुकतंच रिलीज करण्यात आलेलं गाणं चित्रपटात एका महत्त्वाच्या वळणावर येणारं असून, बरंच काही सांगणारं आहे. सुंदर शब्दरचना, सुरेल संगीत, सुमधूर गायन आणि उत्कृष्ट छायाचित्रण यामुळे गाण्याला रसिकांची मोठी दाद मिळत आहे. कथेच्या प्रवाहाशी एकरूप होणारं हे गाणं संगीतप्रेमींच्या मनावर आपला ठसा उमटवण्यात यशस्वी होत आहे, याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
पर्ण आणि सुमित 'विषय हार्ड'च्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. या दोघांसोबत हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकार आहेत.या चित्रपटातील गीतांचे लेखन नंदकुमार गोरुले, सुदर्शन खोत, साहिल कुलकर्णी, सुमित, रिषभ पाटील, विशाल सदाफुले यांनी केले आहे. साहिल कुलकर्णी यांनी या गीतांना संगीत दिलं आहे. अभिषेक शेटे आणि जय पारीख यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, स्वप्नील बांदेकर आणि विनायक सुतार यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी ओंकार शेटे यांनी सांभाळली असून, सायली घोरपडे यांनी वेशभूषा केली आहे. सौरभ प्रभुदेसाई यांनी संकलन केलं असून, संदीप गावडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.