'बाजिंद'मधील रोमँटिक टायटल साँग प्रदर्शित...
'बाजिंद'मधील रोमँटिक टायटल साँग प्रदर्शित...
- शीर्षक गाण्यातून दिसणार हंसराज-पूजाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री
* सिने प्रतिनिधि
संगीतप्रधान 'बाजिंद' या चित्रपटातील रोमँटिक शीर्षक गीत रसिकांच्या भेटीला आलं आहे. प्रदर्शित झाल्यापासून या गाण्याला संगीतप्रेमींची पसंती मिळत आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी 'बाजिंद' संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.
शान फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या 'बाजिंद' चित्रपटाची निर्मिती नंदकुमार शिंदे-सरकार आणि शहाजी पाटील यांनी केली आहे. निर्माते शिंदे-सरकार यांच्या लेखणीतून या चित्रपटाची कथा अवतरली असून, पटकथा, संवाद आणि गीतलेखनासोबतच शहाजी पाटील यांनी दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता हंसराज जगताप या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला पूजा बिरारी ही अभिनेत्री आहे. हंसराज आणि पूजा या नव्या कोऱ्या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांचं लक्ष वेधून घेणारी आहे. 'हातामध्ये हात तुझा, शहारलं अंग, इंद्रधनू नभामध्ये उधळतो रंग...' अशी सुरेख शब्दरचना असलेलं या शीर्षक गीतात गावातील प्रेमी युगूलाच्या प्रेमाचे गुलाबी रंग पाहायला मिळतात. गावाकडच्या साध्याभोळ्या प्रेमाची झलक हेच या गाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. नंदकुमार शिंदे-सरकार यांनी हे गाणं लिहिलं असून, प्राजक्ता शुक्रे यांच्या आवाजात संगीतकार अॅग्नल रोमन यांनी संगीतबद्ध केलं आहे. सॉंग पाहण्यासाठी शान फिल्म क्रिएशनच्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. अल्लड वयातील प्रेमाचा सारीपाट मांडणाऱ्या कथानकाला साजेसं असं टायटल साँग रसिकांच्या पसंतीस पडत आहे. या गाण्याबाबत दिग्दर्शक शहाजी पाटील म्हणाले की, कथानकाच्या गरजेनुसार 'बाजिंद' हे टायटल साँग चित्रपटात घेण्यात आलं आहे. गाणं अगदी साध्या पद्धतीनेच चित्रीत करायचं होतं. त्यानुसार ते बनवण्यात आलं असल्याने संगीतप्रेमींना आवडत आहे. हंसराज आणि पूजा यांची सुरेख केमिस्ट्री हे या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. प्रेमाचे विविध रंग उधळणारं हे गाणं अबालवृद्धांना भावणारं असल्याचंही पाटील म्हणाले.
वितरणाच्या माध्यमातून 'बाजिंद' महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची आणि मार्केटिंगची जबाबदारी वेदिका फिल्म्स क्रिएशनने सांभाळली आहे. हंसराज आणि पूजा यांच्या जोडीला शर्वणी पिल्लई, सिद्धेश्वर झाडबुके, अनिल नगरकर, माधुरी पवार, उषा नाईक, प्रेमा किरण, ओंकार भोसले, प्रियंका राठोड आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. डिओपी इम्तियाज बारगीर यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन निखिल गांधी यांनी केलं आहे. संगीतकार अॅग्नल रोमन यांनी पार्श्वसंगीत देण्यासोबतच निर्मिती व्यवस्थापकाची जबाबदारी सांभाळली असून, आलोक गायकवाड आणि चंद्रकांत निकम प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक आहेत. राजीव शर्मा यांनी कला दिग्दर्शन केलं असून, संजीव राय यांनी स्थिरचित्रण तर संतोष तांबे यांनी कास्टिंग केलं आहे.