यंदाचा महिला दिन साजरा करूया 'झिम्मा' सोबत ...
यंदाचा महिला दिन साजरा करूया 'झिम्मा' सोबत ...
_शुक्रवारपासून चित्रपटगृहात पुन्हा झळकणार
* सिने प्रतिनिधि
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या सुपरहिट चित्रपटाने मागील वर्षी प्रेक्षकांना विशेषतः महिलांना वेडं लावले होते. हा आनंद पुन्हा एकदा महिलांना अनुभवता येणार आहे. निमित्त आहे ८ मार्चचे म्हणजेच जागतिक महिला दिनाचे. याच खास दिनाचे औचित्य साधत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'झिम्मा' पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट आठवड्यावर चित्रपटगृहांत झळकणार आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा प्रदर्शित होणाऱ्या 'झिम्मा' चित्रपटाबद्दल निर्माती क्षिती जोग म्हणतात, "माझं या चित्रपटाशी एक भावनिकदृष्ट्या नातं जोडलं गेलं आहे. हा चित्रपट मी पुन्हा एकदा महिलादिनी माझ्या मैत्रिणीसोबत बघून साजरा करणार आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा त्याच जोमात प्रदर्शित होणार आहे, याचा मला आनंद आहे. महिलांना हा चित्रपट आपल्या जीवनाशी भावनिकदृष्ट्या जवळीक साधणारा वाटला. अनेकींनी हा चित्रपट पाहून संसारातून वेळ काढत आपल्या मैत्रिणींसोबत सहलींचा बेतही बनवला. ज्या स्त्रिया कधीच चित्रपटगृहात गेल्या नव्हत्या, त्या खास 'झिम्मा' बघायला गेल्या. अनेकींनी यांचे हे अनुभव प्रत्यक्ष, सोशल मीडियाद्वारे, मेसेज करून आमच्यापर्यंत पोहोचवले. आयुष्य भरभरून जगायला शिकवणारा हा चित्रपट आहे.''
'चलचित्र कंपनी' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.