'चिकटगुंडे २'चा चौथा एपिसोड शुक्रवारी झळकणार
साहिल आणि हिनाचे वाद जाणार विकोपाला ?
'चिकटगुंडे २'चा चौथा एपिसोड शुक्रवारी झळकणार
* प्रतिनिधि
भाडिपा आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत 'चिकटगुंडे २' ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गौरव पत्की दिग्दर्शित 'चिकटगुंडे २'चा चौथा एपिसोड येत्या शुक्रवारी म्हणजेच ५ मे रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यात साहिल (पुष्कराज चिरपुटकर) आणि हिना (स्वानंदी टिकेकर) ही जोडी दिसणार आहे. 'चिकटगुंडे'च्या पहिल्या सीझनमध्ये या दोघांमधील खट्याळपणा, निरागस प्रेम बघितले. आता सिझन २ मध्ये या दोघांचे नाते अधिकच बहरलेले दिसणार आहे.
नोकरी सोडून वर्षभरापासून घरात बसलेल्या साहिलने दोन छोट्या गेंड्यांसाठी लाखो रूपये खर्च केले असून या गोष्टीवरून हिना आणि त्याच्यात वादावादी होत आहे. आता हे गेंडे त्याने का घेतले आणि त्याच्यावरून हा वाद किती विकोपाला जाणार की त्यांच्यातील अवखळ प्रेमामुळे हा वाद तिथेच संपणार याचे उत्तर 'चिकटगुंडे २' पाहिल्यावरच मिळेल.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "प्रेक्षकांना हलकाफुलका कॉन्टेन्ट पाहायला आवडतो. भाडीपाचे विषय हे नेहमीचे साधे, सर्वसामान्य प्रेक्षकांना आपल्या जवळचे वाटणारे असतात. घराघरातील सरळ, साधी गोष्ट प्रेक्षकांना नेहमीच भावते. सगळ्या वयोगटातील प्रेक्षकवर्गाला केंद्रस्थानी ठेऊन 'भाडिपा' वेगवेगळ्या विषयांवरील वेबसीरिज घेऊन येत असते. 'चिकटगुंडे २' ही सुद्धा अशीच सीरिज असून या वेबसीरिजचा चौथा एपिसोड आणि शेवटच्या एपिसोडमध्येही काहीतरी खास, आश्चर्यजनक अनुभवायला आणि पाहायला मिळेल."