सोनाली- कुणालच्या लग्नाचे स्पेशल गाणे ‘तुला मी, मला तू...’ प्रेक्षकांच्या भेटीला
सोनाली- कुणालच्या लग्नाचे स्पेशल गाणे ‘तुला मी, मला तू...’ प्रेक्षकांच्या भेटीला
* प्रतिनिधि
सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांच्या लग्नाची चर्चा सोशल मिडीयापासून तिच्या चाहत्यांपर्यंत चांगलीच रंगली आहे. सोनाली आणि कुणाल यांच्या लग्नातील काही खास क्षणांवर असलेले ‘तुला मी मला तू…’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे अमेय जोग आणि प्रियांका बर्वे यांच्या सुमधुर आवाजात गायले आहे. तर या गाण्याचे संगीतकार अमेय आणि दर्शना असून गीतकार प्रशांत मडपुवार आहेत.
गाण्यामध्ये दोघांनीही एकमेकांना दिलेले सात जन्माचे वचन, प्री-वेडिंगचा अप्रतिम डान्स, पाहुण्यांची रेलचेल, दागिन्यांमध्ये सजलेले वर- वधू आणि वेगवेगळ्या फुलांच्या माळांनी सजवलेले मंडप असे अनेक क्षणचित्रे यात टिपले आहेत.
गाण्याबद्दल संगीतकार अमेय व दर्शना म्हणतात, “ सातासमुद्रापलीकडे पार पडलेले सोनाली आणि कुणाल यांच्या लग्नावर गाणे करायचे जेव्हा आम्ही ठरवले, तेव्हा कोणताही वेळ न दवडता आम्ही होकार दिला. हे प्रेमगीत प्रत्येकाच्या ओठांवर रूळणारं आहे. लग्नातील क्षणचित्रे गाण्यांमध्ये दाखवणे आमच्यासाठी आव्हानात्मक होते. सोनालीचं हे गाणं तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.”
गाण्याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, “ लग्न म्हटलं तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खास क्षण असतो. माझ्या लग्नातील खास क्षण मी गाण्याच्या स्वरूपात टिपून ठेवला आहे आणि तेच खास क्षण मी माझ्या चाहत्यांसोबत शेअर करतेय ”.