'स्नेहालय’कडून ‘वाय’ला अनोखी भेट...
'स्नेहालय’कडून ‘वाय’ला अनोखी भेट...
* प्रतिनिधि
काही दिवसांपूर्वीच अजित सुर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ या चित्रपटाचे चित्तथरारक टिझर झळकले. टिझर बघून चित्रपटातील गूढ जाणून घेण्याची इच्छा अधिकच तीव्र होऊ लागली. ‘वाय’चे पोस्टर हातात धरून अनेक मान्यवरांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला आणि आता या चित्रपटाला एका सामाजिक संस्थेनं अगदी आगळ्यावेगळ्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या आहेत.
चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने ‘स्नेहालय’, ‘स्नेहांकूर’ आणि ‘युवान’ या लहान मुलांच्या सामाजिक संस्थेला नुकतीच भेट दिली. यावेळी मुक्ताने तिथल्या लहान मुलांसोबत काही क्षण घालवले, त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत काही किस्से शेअर केले. या संस्थेकडूनही तिला एक अनोखी भेट देण्यात आली. तिच्या २४ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वाय’ या चित्रपटाचे अक्षर बनवून त्यांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. मुक्ताने त्यांची ही भेट खूप आनंदाने स्वीकारली.
कंट्रोल एन प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर यांचेच आहेत. सामाजिक संस्थांना दिलेल्या भेटीबद्दल मुक्ता बर्वे म्हणते, ‘’हा अनुभव माझ्यासाठी खूप काही देणारा, शिकवणारा होता. या मुलांना भेटून मन भरून आलं आणि तितकीच त्यांच्याकडून प्रेरणाही मिळाली. रक्ताची नाती नसतानाही ही मुलं इथे इतकी मिळून मिसळून राहतात, याचं विशेष कौतुक वाटलं. या लहानग्यांसोबत घालवलेला क्षण खूप मौल्यवान असून या सर्वांनी ‘वाय’ला दिलेल्या शुभेच्छाही माझ्यासाठी खास आहेत.’’