रणदीप हुड्डा यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा मराठी ट्रेलर प्रदर्शित !

रणदीप हुड्डा यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा मराठी ट्रेलर प्रदर्शित !

रणदीप हुड्डा यांच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा मराठी ट्रेलर प्रदर्शित !

* सिने प्रतिनिधि

    स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी... महान क्रांतिकारक... समाजसुधारक... राजनेता... साहित्यिक... म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. एक विलक्षण  व्यक्तिमत्व. सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त असल्याने त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचा जाज्वल्य विश्वास होता. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्याचे हे अमूल्य योगदान प्रेक्षकांना पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले, त्याच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारणारे रणदीप हुड्डा यांच्यासह चित्रपटाची टीम उपस्थित होती.

     आनंद पंडित मोशन पिक्चर्स, लिजण्ड स्टुडिओज, अवाक फिल्म्स आणि रणदीप हुड्डा फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट झी स्टुडिओजच्या सहकार्याने प्रदर्शित होणार आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित या चित्रपटाचे झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंग, योगेश राहार आणि रणदीप हुड्डा निर्माते असून रूपा पंडित, सॅम खान, अन्वर अली, पांचाली चक्रवर्ती सहनिर्माते आहेत. तर या चित्रपटची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अंकिता लोखंडे यांनी सावरकर यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

सध्या या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात ट्रेलरमधील दमदार स्टारकास्ट, उत्तम कथानक, संवाद, दिग्दर्शन पाहून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीरांना आदरांजली वाहण्यासाठी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा बायोपिक हुतात्मा दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच २२ मार्चला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा प्रवास आणि संघर्ष यात पाहायला मिळणार आहे. 

     चित्रपटाबद्दल रणदीप हुड्डा म्हणतात, " स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव शाळेपासूनच सर्वांना माहित असते. परंतु या नावाबद्दलची, त्यांच्या कार्याबद्दलची माझी उत्सुकता प्रचंड वाढत गेली आणि मी त्यांच्याविषयी सगळी माहिती मिळवू लागलो. मी वाचन केले, काही व्हिडीओज पहिले. हे सगळे करत असतानाच त्यांच्या योगदानावर चित्रपट करावा, हे माझ्या मनात आले आणि अखेर हे स्वप्न आता पूर्ण होतेय. आज याचा विशेष आनंद आहे की, सावरकरांचे शिक्षण याच महाविद्यालयातून झाले आणि त्यांचा मराठी ट्रेलर आम्ही याच ठिकाणी प्रदर्शित करतोय. त्यांचे कार्य, योगदान चित्रपटरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आम्ही ही निर्मिती केली आहे. कथित-अकथित असे अनेक प्रसंग या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. 

  अशा मोठ्या चित्रपटाची निर्मिती करण्याबाबत झी स्टुडिओजचे म्हणणे आहे , " 'एक निर्मिती संस्था म्हणून वीर सावरकरांच्या प्रवासातील गुंतागुंतीचा वेध घेणाऱ्या, भारतीय इतिहासातील या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहाण्याचा नवा दृष्टीकोन प्रेक्षकांना देणाऱ्या चित्रपटाचा भाग होण्याची संधी आम्हाला मिळाली, याचा  अभिमान वाटतो. जवळपास शतकभर चाललेल्या आपल्या गौरवशाली स्वातंत्र्य लढ्याचे छुपे अध्याय आम्ही समोर आणणार आहोत. यातील 'रिअल हिरोज' आम्हाला समोर आणायचे आहेत, मणिकर्णिकापासून सावरकरांपर्यंत आम्ही आपल्या स्वातंत्र्य चळवळीची सशस्त्र प्रतिकार बाजू दाखवत आहोत, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.''