हृता दुर्गुळे म्हणतेय, 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!'
हृता दुर्गुळे म्हणतेय, 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!'
* प्रतिनिधि
प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ येत्या २२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच 'अनन्या'च्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. लवकरच हा प्रवास आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी हृता दुर्गुळेचा ‘अनन्या’पर्यंत पोहोचण्याचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ झळकला असून यात हृता ते ‘अनन्या’ हा प्रवास दाखवण्यात आला आहे. या प्रवासात हृताने ‘अनन्या’ला कसे आपलेसे केले आहे, हे शेअर केले आहे. हृताने घेतलेली प्रचंड मेहनत यात दिसत आहे.
या मेहनतीबाबत हृता दुर्गुळे म्हणते, ‘’ या चित्रपटासाठी मला शारीरिक मेहनत घ्यायची आहे, हे सुरुवातीपासूनच मला ठाऊक होते आणि त्यासाठी मला मानसिकदृष्ट्या खंबीर राहाणे आवश्यक होते. सर्वात आधी माझ्यासमोर वजन कमी करण्याचे आव्हान होते. या दरम्यानच माझे योगा आणि व्यायामाचे प्रशिक्षण सुरू होते. या काळात मी प्रचंड आव्हानात्मक गोष्टी केल्या. अक्षरशः मी रडायचे, कळवळायचे. एका अशा वळणावर मी आले होते की, असे वाटत होते सोडून द्यावे. परंतु मग चित्रपटाच्या टॅगलाईननेच मला स्फूर्ती दिली 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे.' हेच डोक्यात ठेवून मग मी हे आव्हान स्वीकारायचे ठरवले. मला दोन्ही हात नाहीत, हेच मी डोक्यात ठेवून पुढे वावरायला लागले आणि तेव्हाच मला 'अनन्या' सापडली. मी 'अनन्या'शी एवढी एकरूप झाले होते की, पडद्यामागेही अनेक गोष्टी करताना माझ्यात 'अनन्या'च असायची. ही आयुष्याची एक सकारात्मक लढाई आहे, जी ध्येयाकडे नेणारी आहे. 'अनन्या' साकारताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, आपल्याकडे जे आहे, त्यात आनंद मानावा.''
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया या चित्रपटाचे निर्माता आहेत.