नवसंजीवनीचा संदेश देणारा ‘लाईफलाईन’

नवसंजीवनीचा संदेश देणारा ‘लाईफलाईन’

नवसंजीवनीचा संदेश देणारा ‘लाईफलाईन’

* प्रतिनिधि

     आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्ष दाखवणारा, ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'लाईफलाईन' चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून अवयवदानावर एका अनोख्या पद्धतीनं भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी झाला आहे. प्रेक्षकांकडून, अनेक प्रख्यात डॉक्टरांकडून या चित्रपटाचे, दिग्दर्शकाचे कौतुक होत आहे. अवयवदानासारखा संवेदनशील विषय अतिशय उत्तमरित्या पडद्यावर मांडण्यात आले आहे. डॉक्टर आणि किरवंतामधील ही संघर्षमय लढाई असून अवयवदानाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली तर आपला उदरनिर्वाह कसा चालणार, या विचारसरणीचे किरवंत आहेत. हेच विचार बदलणारा हा चित्रपट आहे. वैशिष्टय म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक साहिल शिरवईकर यांनी अवयवदानाबद्दल केवळ जागरूकताच पसरवली नसून याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली आहे. त्यांनी अधिकृतरित्या अवयवदानची प्रक्रिया पूर्ण केली असून ही प्रक्रिया फक्त त्यांनीच नाही तर माधव अभ्यंकर आणि चित्रपटाच्या टीममधील अनेकांनी केली आहे. 

   चित्रपटाबद्दल दिग्दर्शक साहिल शिरवईकर म्हणतात, '' प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून खूप आनंद होतोय. दक्षिण मुंबईसारख्या भागातही या चित्रपटगृहाबाहेर ‘हाऊसफूल’ चे बोर्ड्स ही दिसत आहेत. अवयवदान हा खरोखरच खूप गंभीर विषय आहे आणि लोकांमध्ये याविषयीचे गैरसमज दूर करणे खूप आवश्यक आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून हा विषय अतिशय प्रभावीपणे अनेकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे माझ्या पहिल्याच चित्रपटाचा विषय मी हा घेतला. आमच्या संपूर्ण चित्रपटाच्या टीमने अवयवदानाची प्रतीज्ञा केली आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट पाहून प्रेक्षक भारावून जातील.''

   'लाईफलाईन'ची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह  हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायली आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट चित्रपटाचे निर्माते आहेत.