मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्लॅनेट मराठी ओटीटीवर 'लाभले आम्हास भाग्य'
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्लॅनेट मराठी ओटीटीवर 'लाभले आम्हास भाग्य'
* सिने प्रतिनिधि
कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच प्रख्यात नाटककार, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंती दिनानिमित्त दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी भाषेला लाभलेला साहित्याचा वारसा जपण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या खास दिनाचे औचित्य साधून प्लॅनेट मराठी ओटीटीवर 'लाभले आम्हास भाग्य' हा विशेष कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन पुष्कर श्रोत्री यांनी केले असून यात प्रमुख भूमिका आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री आणि संदीप पाठक यांनी साकारली आहे. एक तासाचा हा खास कार्यक्रम प्रेक्षकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता पाहता येणार आहे.
'लाभले आम्हास भाग्य' बद्दल दिग्दर्शक, अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणतात, '' या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कोणाला भाषा शिकवणे, उपदेश करणे हा नसून, आम्हाला मराठी भाषा बोलताना जो आनंद मिळतो, तो तुम्ही सुद्धा घ्यावा, हा एवढाच या मागचा उद्देश आहे. मुळात मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम आम्ही गंमतीजंमती, मजा करत केलेला असून मराठी भाषेचं वैभव दाखवण्याचा प्रयत्न आम्ही यातून केला आहे.''
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' प्लॅनेट मराठी सुरु करण्याचा मुख्य उद्देशच हा आहे, की मराठी भाषेला लाभलेला साहित्याचा वारसा, संस्कृती जगभरातील प्रेक्षकांपर्यंत मनोरंजाच्या स्वरूपात पोहोचावी आणि म्ह्णूनच या खास दिनाचे निमित्त साधत आम्ही हा कार्यक्रम आमच्या प्रेक्षकांसाठी आणला आहे. यात हलक्याफुलक्या पद्धतीने मराठी साहित्याचे संवर्धन करण्याचा मोलाचा सल्ला देण्यात आला आहे. हा कार्यक्रम २७ फेब्रुवारीपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.''