प्रेमात अभिनयचे लागणार ‘बांबू’ : ‘बांबू’चा भन्नाट टीझर प्रदर्शित
प्रेमात अभिनयचे लागणार ‘बांबू’ :
‘बांबू’चा भन्नाट टीझर प्रदर्शित
* सिने प्रतिनिधि
प्रेमाचा इतिहास काय सांगतो, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला तर कोणाचा तरी खांदा लागतोच. हीच ओळ अधोरेखित करणारा विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’ या भन्नाट सिनेमाचे टीझर सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, स्नेहल शिदम, समीर चौघुले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शनची असून तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. तर ‘बांबू’चे लेखन अंबर हडप यांनी केले आहे.
टीझरमध्ये अभिनयच्या खांद्यावर अनेक मुली येऊन रडत आहेत. डोळे, नाक, कान पुसत आहेत. मात्र त्याच्या आयुष्यात अजून कोणीच मुलगी आलेली दिसत नाही. आता त्याच्या आयुष्यात कोणी मुलगी येणार की, त्याचेही ‘बांबू’ लागणार. हे २६ जानेवारीला कळणार आहे. या टीझरमध्ये सर्वात लक्षवेधी ठरत आहेत, त्या टीझरच्या शेवटी असलेल्या संस्कृत ओळी. आता याचा नेमका अर्थ काय, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘बांबू’ची खासियत म्हणजे यात अभिनय बेर्डे नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनयचा हा नवीन अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
दिग्दर्शक विशाल सखाराम देवरूखकर म्हणतात, ‘’ हा विषय तरूणाईला भुरळ घालणारा आहे. या वयात प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणांनी बांबू हे लागतातच. त्यामुळे ‘बांबू’ची कथा कुठेतरी प्रेक्षकांना आपली कथा वाटेल. जुन्या दिवसांची, प्रेमाची आठवण करून देणारा ‘बांबू’ आहे.’’
निर्माता संतोष खेर म्हणतात, ‘’ हा विषय खूप अपिलिंग आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची एक खासियत आहे आणि ही खासियत प्रेक्षकांना पडद्यावर दिसेल. प्रेक्षकांचे शंभर टक्के मनोरंजन होणार, याची खात्री आहे. हा चित्रपट संपूर्ण कुटूंबानी एकत्र सिनेमागृहात जाऊन पाहावा असा आहे.