आयुष्याला कलाटणी देणारा 'कानभट' १९ मेपासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर
आयुष्याला कलाटणी देणारा 'कानभट'
१९ मेपासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर
* सिने प्रतिनिधि
नवनवीन विषय हाताळून प्रेक्षकांना मनोरंजनचा खजिना उपलब्ध करून देणे, ही प्लॅनेट मराठी ओटीटीची खासियत आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी प्लॅनेट मराठी सज्ज झाले आहे. 'कानभट' असे या चित्रपटाचे नाव असून नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. रश प्रॉडक्शन प्रा. लि. निर्मित या चित्रपटाची निर्माती आणि दिग्दर्शिका अपर्णा एस होशिंग आहेत. तर कथा आणि पटकथा अपर्णा एस होशिंग आणि विवेक बोऱ्हाडे यांची आहे. 'कानभट'मध्ये भव्या शिंदे, ऋग्वेद मुळे, संजीव तांडेल, विपीन बोराटे, मनीषा जोशी, अनिल छत्रे आणि विजय विठ्ठल वीर यांच्या प्रमुख भूमिका असून एका लहान मुलाचा भट होण्यापर्यंचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे.
'कानभट' या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला एका लहान मुलाची मुंज दाखवण्यात आली असून त्याला वेदविद्यालयात पाठवण्यात येत आहे. मात्र त्याच्या मनाविरुद्ध इथे पाठवल्याने त्याच्या बालमनावर झालेला परिणाम यात दिसत आहे. या मुलाच्या आयुष्यात कानभट गुरुजी आल्याने त्याचे आयुष्य कसे बदलते, त्याचा एका वेगळ्याच वाटेवरील प्रवास सुरु होतो. आता हा प्रवास त्याला कोणत्या वाटेवर आणून सोडतो, हे 'कानभट'मध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १९ मे रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून सब्स्क्रिप्शन न भरता केवळ एक ठराविक रक्कम भरून हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " हा चित्रपट पाल्यांनी आपल्या पालकांसोबत आवर्जून पाहावा, असा आहे. हा चित्रपट जुन्या काळातील शिक्षण पद्धती, रीती, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडवणारा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात किती महत्वाच्या आहेत, याचे पैलू 'कानभट' मधून उलगडणार आहेत. खूप सुंदर आणि साधी अशी ही कथा असून आयुष्याला कलाटणी देणारा हा चित्रपट आहे.''