मातृदिनाच्या निमित्ताने ‘मायलेक’ची घोषणा

मातृदिनाच्या निमित्ताने ‘मायलेक’ची घोषणा : सोनाली खरे निर्मिती क्षेत्रात
* अमित मिश्रा
मातृदिनाचे खास निमित्त साधत सोनाली खरे हिने ब्लुमिंग लोटस प्रॅाडक्शन हाऊसची निर्मिती केली असून या प्रॅाडक्शन हाऊस अंतर्गत ‘मायलेक’ या पहिल्या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटात आई आणि मुलीच्या सुंदर, हळव्या नात्यावर भाष्य करण्यात येणार आहे.
नुकत्याच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये आई आणि मुलीच्या नात्याचे आंबटगोड स्वरूप दाखवण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. मायलेकीच्या नात्यातील जिव्हाळा, प्रेम आणि एक वेगळीच कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाबदल निर्माती सोनाली खरे म्हणते, " मी निर्मित केलेला हा पहिला चित्रपट आहे. मातृदिन हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास असतो. आईचे एक वेगळे महत्व प्रत्येकाच्या आयुष्यात असते. मुलगी आणि आईच्या नाजुक नात्यावर बोलणारा हा चित्रपट आहे. या खास दिनी माझा पहिला चित्रपट ‘मायलेक'ची घोषणा करणे, हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. लवकरच ‘मायलेक’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून हळूहळू अनेक गोष्टी समोर येतील."
या चित्रपटाचे लेखन एमेरा यांनी केले असून छायाचित्रण मृदुल सेन यांनी केले आहे.