'सूर लागू दे' चित्रपटाचा लक्षवेधी टिझर प्रेक्षकांच्या भेटीला...
'सूर लागू दे' चित्रपटाचा लक्षवेधी टिझर प्रेक्षकांच्या भेटीला...
* सिने प्रतिनिधि
दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्या स्मृती जागवणारा 'सूर लागू दे' हा चित्रपट लवकरच रसिक दरबारी सादर होणार आहे. आपल्या अभिनयानं सर्व माध्यमं व्यापून टाकणाऱ्या विक्रम गोखले यांच्या पश्चात प्रदर्शित होणारा 'सूर लागू दे' हा चित्रपट खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली वाहणारा ठरणार आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच मोठ्या उत्साहात प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाची पहिली झलक दाखवणारा हा टिझर रसिकांसोबतच सिनेसृष्टीतील दिग्गजांच्याही पसंतीस उतरत आहे. अल्पावधीतच या टिझरला हजारो लाईक्स मिळाले असून, विक्रम गोखलेंच्या चाहत्यांसोबतच इतरही रसिक 'सूर लागू दे'चा टिझर मोठ्या प्रेमानं सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
मुंबईतील महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये स्त्रीशक्तीचा नारा बुलंद करत 'सूर लागू दे' या मराठी चित्रपटाचा टिझर मोठ्या थाटात लाँच करण्यात आला. याप्रसंगी निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांसोबतच चित्रपटाची संपूर्ण टिम उपस्थित होती. निर्माते अभिषेक 'किंग' कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली 'सूर लागू दे' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांनी वितरणाच्या माध्यमातून हा चित्रपट सर्वदूर पोहोचवण्याची मोलाची कामगिरी स्वीकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण विजया एकनाथ बिरजे यांनी केलं आहे. 'सूर लागू दे'चा टिझर खऱ्या अर्थानं चित्रपटाची तोंडओळख करून देणारा आहेच, पण त्या जोडीला उत्कंठाही वाढवणारा आहे. या चित्रपटात दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचं आहे याबाबत कुतूहल निर्माण करणाऱ्या टिझरचं सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्य भूमिकेतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते विक्रम गोखले आणि अभिनेत्री सुहासिनी मुळये या दोन दिग्गजांची जुगलबंदी यात पहायला मिळणार असल्याचं टिझरवरून जाणवतं. मालिकांसोबतच मराठी चित्रपटांमध्येही लोकप्रिय असलेली अभिनेत्री रीना मधुकरनं साकारलेल्या कॅरेक्टरचीही झलक टिझरमध्ये आहे. 'कलियों का चमन...' फेम मेघना नायडू या चित्रपटात एका सरप्राईज पॅकेजच्या रूपात दिसणार आहे. 'सूर लागू दे' या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं असून, संगीत पंकज पडघन यांनी दिलं आहे.
टिझर लाँच सोहळ्यात व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना सुहासिनी मुळ्ये म्हणाल्या की, 'सूर लागू दे' हि नातेसंबंधांची गोड कथा आहे. एक महान आणि अतिशय प्रिय कलाकार विक्रम गोखले यांचा दुर्दैवानं हा शेवटचा सिनेमा ठरणार आहे. या सिनेमाचं शेवटचं शेड्यूल सुरू होण्यापूर्वी विक्रमजींनी मला फोन केला. ते म्हणाले की, मला माझं कुठलंही काम अर्धवट सोडायचं नाही. त्या नाजूक परिस्थितीतही त्यांनी १४-१४ तास काम करून 'सूर लागू दे'चं शूटिंग पूर्ण केलं. हा चित्रपट प्रेक्षकांनी फक्त विक्रमजींसाठी बघू नये असं मला वाटतं. त्यांचं गोड-उत्कृष्ट काम आणि अतिशय चांगली गोष्ट असल्यानंही हा चित्रपट बघावा. असं आवाहनही सुहासिनी मुळ्ये यांनी केलं. 'सूर लागू दे' हा चित्रपट एक महत्त्वपूर्ण संदेश जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार असल्याची भावना मेघना नायडूनं व्यक्त केली. मेघना म्हणाली की, मराठी चित्रपट आज सिनेमहोत्सवांसोबतच पुरस्कार सोहळ्यांमध्येही बाजी मारत आहेत. 'सूर लागू दे' हा चित्रपटही त्याच पठडीतील असून समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब दाखवणारा आहे. एक व्यक्ती आयुष्याच्या संध्याकाळीही कशाप्रकारे संघर्ष करत इतरांसाठी प्रेरणादायी कार्य करते यांचं यथार्थ चित्रण 'सूर लागू दे'मध्ये करण्यात आलं आहे. 'सूर लागू दे' हा चित्रपट खऱ्या अर्थानं जीवनातील सप्तसूर छेडणारा असल्याचं सांगत रीना म्हणाली की, हा चित्रपट बऱ्याच अर्थांनी वेगळा आहे. विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्येंसारख्या मातब्बर कलाकारांसोबत काम करताना त्यांच्याकडून महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याची संधी या निमित्तानं मिळाली. चित्रपटाची पटकथा सुरेख असून, दिग्दर्शक प्रवीण बिरजे यांच्या कल्पक दिग्दर्शनातून ती पाहताना रसिक एन्जॅायही करतील आणि त्यातील मेसेज सोबत घेऊनही जातील अशी खात्रीही रीनानं व्यक्त केली.