पिकल म्युझिकचे मातृदिनाच्या मुहूर्तावर 'आईच्या माघारी' गाणं प्रदर्शित...
पिकल म्युझिकचे मातृदिनाच्या मुहूर्तावर 'आईच्या माघारी' गाणं प्रदर्शित...
* सिने प्रतिनिधि
आई आणि तिची महती प्रत्येकालाच माहित आहे. देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, म्हणून त्याने आपल्या ठायी असलेल्या सर्व गुणांचा समावेश करून आई घडवली असं म्हणतात. देव कोणी पाहिलेला नाही, पण त्याचंच मूर्त रूप असलेली आई प्रत्येकाच्या मागे सावलीप्रमाणे उभी असते. त्यामुळेच कदाचित देवापेक्षाही कांकणभर आईचा दर्जा श्रेष्ठ मानला जातो. कितीही धन-दौलत असेल आणि आई नसेल तर तो एक प्रकारे भिकारीच असतो. म्हणूनच 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी' असं समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवलंय. १४ मे हा सर्वत्र मातृदिन म्हणून साजरा केला जातो. मातृत्वाच्या या सणाचं औचित्य द्विगुणीत करण्यासाठी पिकल म्युझिकने 'आईच्या माघारी' हे नवं कोरं गाणं रसिकांच्या भेटीला आणलं आहे.
पिकल म्युझिकने आजवर नेहमीच विविधांगी गाण्यांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करण्याचं व्रत जोपासलं आहे. यंदाच्या मातृदिनाच्या मुहूर्तावर पिकल म्युझिकचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी 'आईच्या माघारी' हे गाणं घेऊन आले आहेत. हे गाणं म्हणजे 'प्रिन्स' तथा महेश आफळे यांच्या 'प्रतिमांतर' या पुस्तकातील कविता आहे. वुडस्टॅाक स्टुडिओजच्या बॅनरखाली लायला व मयूरेश अधिकारी यांनी या गाण्याची निर्मीती केली आहे. हयात असो वा नसो, आईच्या मायेचा दृश्य-अदृश्य पदर सतत आपल्यावर असतोच; परंतु आई हे जग सोडून गेल्यावर माहेरी आलेल्या लेकीची भावोत्कट अवस्था नेहमीच्या साचेबंद वा पारंपरिक पद्धतीने न टिपता दृक माध्यमातून या गाण्यात सादर करताना एक वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. या गाण्यात नृत्यशैली आणि भावमुद्रा यांचा अभिनव संगम अनुभवण्यास मिळेल. एका अर्थाने ही निर्मिती म्हणजे अस्सल कविता, सिम्फनीक संगीत व गायन आणि पाश्चिमात्य शैलीचे नृत्य यांची त्रिवेणी संगम आहे. आपल्याच जुन्या घरी आईच्या माघारी घेरून येणारे हरवलेपण आणि एकाकीपण त्यातून वेगळ्या पद्धतीने प्रतीत होते. जन्म आणि मृत्यू यामध्ये उभा असलेला हा उंबरठा व त्यातून जाणवणारे 'आईचे असणे आणि नसणे' यातील अंतर या गाण्याद्वारे अधोरेखित करण्यात आलं आहे.
नव्या दमाचे संगीतकार व संगीत संयोजक मयुरेश अधिकारी यांनी संगीतबद्ध केलेलं हे आर्त आशयाचं गाणं गायिका लायला यांनी अतिशय परिणामकारकरित्या गायलं आहे. त्यावर सोनालिसा यांनी अत्यंत प्रभावी कोरिओग्राफी आणि सादरीकरण केले आहे. नितीश बुधकर यांनी या व्हिडीओ दिग्दर्शित केला असून, विभव राजाध्यक्ष यांनी क्रिएटीव्ह दिग्दर्शन यांनी केलं आहे. सिनेमॅटोग्राफी व एडीटींग द मीडिया हाऊसच्या मयूर रेवाळे, ऋषिकेश गावडे, विक्रांत चिकणे, वैभव चिकणे, सूर्यकांत गोठणकर यांनी केलं आहे. ध्वनी संस्करण ओंकार तरकसे यांचे असून, प्रकाशयोजना आकाश व दीपक यांची आहे.