बाप्पाचे दर्शन घेत 'जगून घे जरा' चित्रपटाची घोषणा...
![बाप्पाचे दर्शन घेत 'जगून घे जरा' चित्रपटाची घोषणा...](https://pen-n-lens.in/uploads/images/2023/09/image_750x_6513091ec931a.jpg)
बाप्पाचे दर्शन घेत 'जगून घे जरा' चित्रपटाची घोषणा...
* सिने प्रतिनिधि
'जगून घे जरा' चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन शिरीष लाटकर यांचे आहे. या चित्रपटात राकेश बापट व सिद्धी म्हांबरे हे कलाकार पाहायला मिळतील. सिद्धी म्हांबरेच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन चेहरा मिळाला आहे. चित्रपटातील गाण्यांना निलेश मोहरीर व अमित राज यांचे संगीत लाभले आहे. नुकतेच गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी 'जगून घे जरा' चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी बाप्पाचा आशीर्वाद घेत चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे म्हणतात, " आज गणेशोत्सवानिमित्त 'जगून घे जरा' या चित्रपटाची घोषणा आम्ही केली आहे. या चित्रपटात राकेश आणि सिद्धी यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा रोमँटिक, प्रेरणादायी व मनाला स्पर्श करणारी आहे. 'जगून घे जरा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल."
प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “ महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाचा आशीर्वाद घ्यायला सगळे जमतात. आज लालबागच्या राजाच्या चरणी आम्ही ‘जगून घे जरा’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले याचे मनाला समाधान वाटते. ‘जगून घे जरा’ ही एक अनोखी संवेदनशील अशी प्रेमकथा आहे. जसे सर्वांचे बाप्पासोबत भावनिक नाते आहे तसाच हा चित्रपट देखील भावनांवर व नात्यांवर भाष्य करणार आहे. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”
८८ फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, हार्दिक गज्जर फिल्म्स यांच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी क्षितिजा खंडागळे यांनी सांभाळली असून हृषिकेष गांधी यांचे छायाचित्रण आहे.